Pratik Gandhi On Phule Movie Failure: “खूप अपेक्षा होत्या पण…”, ‘फुले’च्या अपयशावर प्रतीक गांधीची खंत; म्हणाला, “सिनेमा लोकांपर्यंत पोहोचलाच नाही”

Pratik Gandhi On Phule Movie Failure: थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधीने महात्मा फुलेंची, तर अभिनेत्री पत्रलेखाने सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली होती.
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो अनेक कारणांनी चर्चेत आला होता. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही शब्दांवर आक्षेप घेत बदल सुचवले होते. ‘मांग’, ‘महार’, ‘पेशवाई’ हे शब्द हटवण्यास सांगितले गेले होते. तसेच ब्राह्मण समाजातील काहींनी या चित्रपटावर आक्षेप नोंदवला होता. अनेक अडथळ्यांनंतर २५ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. मात्र, प्रदर्शनाानंतर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
पहिल्यांदाच या अपयशाबद्दल बोलताना प्रतीक गांधी म्हणाला,
“हो… एखादा सिनेमा चालला नाही, तर थोडं वाईट वाटतं. विशेषतः ‘फुले’सारख्या चित्रपटासाठी माझ्या मनात खूप अपेक्षा होत्या. मला वाटलं होतं की तो सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, पण तसं झालं नाही, याची खंत आहे.”
प्रतीक पुढे म्हणाला,
“जेव्हा मी एखाद्या चित्रपटाची संहिता वाचतो, तेव्हा ठरवतो की ती भूमिका माझ्यासाठी योग्य आहे का. एकदा ती स्वीकारली की, मी माझं १००% देतो. प्रेक्षकांच्या प्रतिसादापेक्षा मला माझ्या कामातून समाधान मिळतं.”
चांगले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खास यंत्रणा असावी का, या प्रश्नावर तो म्हणाला,
“हो, नक्कीच. इंडस्ट्रीत अशी एक व्यवस्था असायला हवी जी चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल. तंत्रज्ञान आहेच, फक्त योग्य पद्धत शोधण्याची गरज आहे. इंडस्ट्री त्या दिशेने हळूहळू जात आहे, पण अजून काम करावं लागेल.”
दरम्यान, ‘स्कॅम १९९२’ या वेबसीरिजमुळे प्रतीक गांधीला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘मडगाव एक्स्प्रेस’, ‘दो और दो प्यार’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. लवकरच तो ‘सारे जहाँ से अच्छा’ या सीरिजमधून हेराच्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे.





