कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तब्बल महिनाभरानंतर कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी तेलंगणातून 24 मार्च रोजी अटक केली. सध्या प्रशांत कोरटकर पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, कोल्हापूर कोठडीत मध्यरात्री प्रशांत कोरटकरच्या छातीत कळा आल्याने पोलिसांनी तातडीने हलचाली करत कोरटकरची वैद्यकीय तपासणी केली. (Kolhapur police) दरम्यान, वैद्यकीय तपासणी करून त्याला चौकशीसाठी इतर ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपासाच्या कारणास्तव पोलीस प्रशांत कोरटकरला दुसरीकडे घेऊन गेल्याचे समजत असून रात्रभर चौकशी केल्यानंतर पहाटे पाच वाजता नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत कोल्हापूर पोलीसांनी प्रचंड गोपनीयता ठेवली, कोरटकरला नक्की कुठे हलवण्यात आले हे समजू शकले नाही. कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरची रवानगी 28 मार्चपर्यंत राजारामपुरी पोलीस ठाण्यात केली होती. (Prashant Koratkar) मध्यरात्रीच कोरटकरला तुरुंगातून हलवलं प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. कोरटकरने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, जो अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी 18 मार्च रोजी फेटाळला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, तपास जलद गतीने व्हावा म्हणून न्यायालयाने कोरटकरला पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता मध्यरात्री कोरटकरच्या छातीत दुखत असल्याने त्याला वैद्यकीय तपासासाठी पोलीसांनी कोठडीतून दुसरीकडे नेले. दरम्यान, कोरटकरने फरार राहिलेल्या काळात कुठं वास्तव्य केले, या माहितीची सत्यता पडताळणीसाठी पोलीस रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता; चौकशीत कोरटकरची कबुली प्रशांत कोरटकर याने पोलीस चौकशीत आपला कबुलीजबाब दिला आहे. इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली त्याने दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय, आपल्या मोबाईलमधील सगळा डेटा मीच उडवल्याची कबुली देखील कोरटकरने दिली असल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणामध्ये कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. कोरटकर हा हैद्राबाद मार्गे चेन्नईमध्ये पळून जाण्याचा तयारीत असल्याचीही माहिती चौकशीत समोर आली.