Sunil Tatkare : “ते रणनीतीकार असतील, पण मला रणनीतीकारांची गरज नाही” – सुनील तटकरे
मला काय असल्या रणनीतीकार किंवा सर्व्हेची गरज नाही. मी फिल्डमध्ये काम करणारा आहे. गावातील लोकांना, तरुणाईला भेटल्यानंतर मला अंदाज येतो. मी आठवेळा महाराष्ट्र उलथापालथा केला आहे.

Sunil Tatkare | Prashant kishor – प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची ही भेट औपचारिक असावी. त्यामध्ये काय चर्चा झाली याची मला माहिती नाही. तसेच आम्ही फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते आहोत, आठ वेळा अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. त्यामुळे आपल्याला रणनीतीकारांची गरज नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
सुनील तटकरे म्हणाले, प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाल्याची माहिती मिळाली. त्यांची ती औपचारिक भेट होती. त्यांची काय चर्चा झाली याबाबत मला माहिती नाही. आम्ही प्रॅक्टिकल आहोत. पवार साहेब, अजितदादा आणि इतर नेत्यांसोबत मी काम केले आहे. मी माझ्या आयुष्यात निवडणुकीचा सर्व्हे कधीही केला नाही.
मला काय असल्या रणनीतीकार किंवा सर्व्हेची गरज नाही. मी फिल्डमध्ये काम करणारा आहे. गावातील लोकांना, तरुणाईला भेटल्यानंतर मला अंदाज येतो. मी आठवेळा महाराष्ट्र उलथापालथा केला आहे. राज्याचा कानाकोपरा मला माहिती आहे. चांद्यापासून बांद्यापासून मी माहिती सांगू शकतो.
आम्ही पक्षाचे संघटन बांधत असताना जनतेला, शेतकऱ्यांना, उद्योजकांना नेमके काय पाहिजे याची माहिती आहे. त्यात कुणाचा सल्ला मिळाला तर तो ठीक आहे. ते रणनीतीकार असतील, पण ते आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही याची मला माहिती नाही. प्रशांत किशोर यांची नेमणूक झाली असती तर त्याची माहिती मला असती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीकडून वृत्ताचे खंडन
रणनीतीकार प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान संघटना बळकट करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. पक्ष कसा बळकट करता येईल आणि सरकारच्या विकास योजना तळागाळातील लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील, यावर चर्चा करण्यासाठी ही एक अंतर्गत बैठक होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले.
तसेच, किशोर यांनी सुनील तटकरे यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्याची चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट करत संबंधित दावा फेटाळून लावला.





