किशोर यांच्या संस्थेचा तेलंगण राष्ट्र समितीशी करार; कॉंग्रेस नेत्यांनी घेतला आक्षेप

नवी दिल्ली, -निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी (आय-पॅक) या संस्थेने तेलंगण राष्ट्र समितीशी (टीआरएस) करार केला आहे. त्यावर कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे किशोर यांच्या संभाव्य कॉंग्रेस प्रवेशाविषयीचा सस्पेन्स पुन्हा वाढला आहे.
कॉंग्रेस आणि किशोर यांच्यातील जवळीक वाढली आहे. कॉंग्रेसच्या पुनरूज्जीवनासाठी किशोर यांनी एक प्लॅनही सादर केला आहे. एवढेच नव्हे तर, स्वत: किशोर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यांच्या प्रवेशाबाबत कॉंग्रेसमध्ये अद्याप मतैक्य झाले नसल्याचे समजते. इतर पक्षांबरोबर असलेले संबंध किशोर यांनी तोडावेत, अशी भूमिका कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी घेतली आहे.
अशात तेलंगणमधील सत्तारूढ टीआरएस आणि आय-पॅकमधील कराराची माहिती पुढे आली. तेलंगणात पुढील वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीसाठी आय-पॅक संस्था टीआरएसला मदत करणार आहे.
ती बाब कॉंग्रेसच्या काही नेत्यांना रूचलेली नाही. किशोर यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे साकडे त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाला घातले आहे. दुसरीकडे, टीआरएसने आय-पॅकशी करार केल्याची माहिती देतानाच त्या संस्थेपासून आता किशोर दूर झाले असल्याचे म्हटले.





