Bihar Election : प्रशांत किशोर यांनी मांडला नवा फॉर्म्युला; बिहारमध्ये भाजपला रोखण्याचा निर्धार
Prashant Kishor | Bihar Election – जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यासाठी नवा फॉर्म्युलाही त्यांनी मांडला. त्या फॉर्म्युलाचा भर हिंदू आणि मुस्लिम समुदायांना एकत्र आणण्यावर असेल.
किशोर यांनी शनिवारी जनसुराज पक्षातील मुस्लिम नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षाच्या रणनीतीविषयीचे सूतोवाच केले. सर्व हिंदूंचा भाजपला पाठिंबा नाही. खरेतर, बहुसंख्य हिंदू भाजपच्या पाठिशी असल्याचेही म्हणता येऊ शकत नाही.
आमचा विचारसरणीवर आधारित युती घडवण्याचा विचार आहे. महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर श्रद्धा असणारे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये आम्ही युती घडवू इच्छितो. तशा प्रकारची जुळणी सहजपणे भाजपचा पराभव करू शकते, असे त्यांनी म्हटले.
निवडणूक रणनीतीकार म्हणून किशोर यांनी देशभरात स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यानंतर ते स्वत: राजकारणात सक्रिय झाले आहेत. स्वतंत्र पक्ष स्थापन करून ते राजकीय नशीब आजमावण्यास सज्ज झाले आहेत. बिहारमध्ये प्रामुख्याने सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत मुख्य लढत रंगेल.
मात्र, त्या दोन्ही प्रमुख आघाड्यांपासून दूर राहत स्वबळावर लढण्याचा निर्णय किशोर यांनी घेतला आहे. त्यांच्या पक्षामुळे बिहारमधील निवडणूक आणखीच रंगतदार ठरू शकेल, असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.





