Prashant Kishor Maun Vrat : जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी गुरूवारी दिवसभर मौन व्रत पाळले. बिहार विधानसभा निवडणुकीतील नामुष्कीजनक पीछेहाटीनंतर आत्मचिंतनाचा भाग म्हणून त्यांनी ते पाऊल उचलले. बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील महात्मा गांधी आश्रमात किशोर यांनी ठरल्याप्रमाणे मौन व्रत केले. निवडणूक रणनीतीकार म्हणून मोठा लौकिक मिळवणाऱ्या किशोर यांनी राजकारणात उडी घेतली. पक्ष स्थापन करून ते बिहारमधील राजकीय रणसंग्रामाला सामोरे गेले. त्या पक्षामुळे बिहारमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली गेली. प्रत्यक्षात किशोर यांच्या पक्षाला सपाटून मार खावा लागला. तो पक्ष खातेही उघडू शकला नाही. मोठी हवा झालेला जन सुराज पक्ष ४ टक्के मतांचा पल्लाही गाठू शकला नाही.