Prashant Kishor : बिहारमधील किती जवान संघर्षावेळी शहीद झाले?; प्रशांत किशोर यांनी केंद्र सरकारकडे मागितली माहिती

पाटणा : भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकताच संघर्ष झाला. त्यावेळी बिहारमधील किती जवान शहीद झाले याविषयीची माहिती केंद्र सरकारने द्यावी, अशी मागणी जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केली आहे.
बिहारच्या सारन जिल्ह्यात किशोर यांनी सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) शहीद उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षविराम होऊन काही दिवस लोटले आहेत. त्यानंतरही शहीद जवानांचे पार्थिव मूळ गावी येण्याचे सत्र सुरू असल्याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे संघर्षात बिहारचे नेमके किती जवान शहीद झाले याविषयीची अचूक माहिती दिली जावी अशी माझी विनंती आहे.
काही दिवस आधी ६ शहीद जवानांचे पार्थिव बिहारमधील मूळ गावी पाठवण्यात आले. आता ती संख्या वाढून ९ इतकी झाली असल्याचे समजते. संघर्षात किती जवान शहीद झाले आणि अपघातासारख्या इतर कारणांनी किती जवानांचा मृत्यू झाला ते जनतेला समजायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली.





