पाटणा : जन सुराज पक्षाच्या ३ उमेदवारांनी बिहार विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर त्या पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भाजपच्या दबावामुळे तसे घडल्याचा आरोप केला. सत्ताधारी एनडीएला पराभवाची प्रचंड धास्ती वाटू लागली आहे. त्यातून विरोधी पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्यासाठी धमकावले जात आहे, असा दावाही त्यांनी केला. किशोर यांचा पक्ष प्रथमच निवडणुकीला सामोरा जात आहे. त्या पक्षाने बिहारमधील सर्व २४३ जागांवर उमेदवार दिले. मात्र, ३ उमेदवारांच्या माघारीमुळे त्या पक्षाचे आता २४० उमेदवार मैदानात असतील. संबंधित घडामोड किशोर यांच्या नवख्या पक्षासाठी मोठा राजकीय हादरा मानली जात आहे. उमेदवारांच्या अचानक माघारीनंतर किशोर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, एनडीएवर आरोपांची सरबत्ती केली. लोकशाहीची हत्या केली जात आहे. देशात याआधी कधीच असे घडलेले नाही, असे ते म्हणाले. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या सुरक्षेची निश्चिती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील सूरत मॉडेलची पुनरावृत्ती भाजप करू पाहत आहे. सूरतमधील त्या पक्षाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. इतर सर्व उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले गेल्याने तसे घडले. त्याची शिक्षा देशभरात मतदारांनी भाजपला दिली. तो पक्ष लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देत होता. प्रत्यक्षात त्या पक्षाला केवळ २४० जागाच जिंकता येऊ शकल्या, अशा शब्दांत किशोर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.