Pranjal Khewalkar : नाथाभाऊंच्या जावयाला मोठा दिलासा; प्रांजल खेवलकर दोन महिन्यांनी येणार तुरूंगाबाहेर

पुणे : खराडी येथील हॉटेलमध्ये झालेल्या कथित अमली पदार्थ पार्टी प्रकरणात आरोपी डॉ. प्रांजल खेवलकरला विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी जामीन दिला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांपासून कोठडीत असलेल्या डॉ. खेवलकरची जामिनावर सुटका होणार आहे. डॉ. खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आहेत.
खेवलकरने अॅड. हृषीकेश गानू आणि अॅड.पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याच प्रकरणात प्राची शर्मा हिचाही जामीन झाला आहे. तिने अॅड. राजू लक्ष्मणराव मते आणि अॅड. श्रीनाथ राजू मते यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
खराडीतील ‘हॉटेल स्टेबर्ड’मधील एका खोलीत २७ जुलै रोजी सुरू असलेल्या अमली पदार्थ पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. डॉ. खेवलकर याच्यासह सात आरोपींना अटक केली. आरोपींकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा, हुक्का सेट, दारूच्या बाटल्या, दोन वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस कोठडीत प्राथमिक चौकशी झाल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर खेवलकरने अॅड. हृषीकेश गानू आणि अॅड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. विशेष न्यायालयाने तपास अधिकारी, सरकारी वकील व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत खेवलकरला जामीन मंजूर केला. या प्रकरणात सर्व आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.





