Solapur News : प्रणिती शिंदेंची नाराजी भोवली; काँग्रेसकडून ‘या’ नेत्याची तडकाफडकी उचलबांगडी

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोलापूर लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या पुनर्बांधणीस सुरुवात केली आहे. यावेळी काँग्रेसने मोठा निर्णय घेत मंगळवेढा शहराध्यक्ष राजाभाऊ चळेकर यांची उचलबांगडी करत त्यांच्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काँग्रेस पक्षात आलेले ॲड राहुल घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते घुले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
खासदार प्रणिती शिंदेंची नाराजी भोवली
लोकसभा निवडणुकीत मंगळवेढ्यातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्क्य मिळाले होते. मात्र, शहराध्यक्ष राजाभाऊ चळेकर यांना प्रणिती शिंंदे यांनी जाहीरपणे लोकसभा निवडणुकीच्या कामाबाबत जाहीरपणे फटकारले होते. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुठे दिसला नाहीत, तुम्ही कुठे होता, अशी विचारणा प्रणिती शिंदे यांनी राजाभाऊ चळेकर यांना केली होती. लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या प्रचारातील सहभागाबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी सवाल उपस्थित केले होते. याची दखल घेत वरिष्ठांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभेत पक्षाच्या विरुद्ध भूमिका
विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ चळेकर यांनी थेट काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतली होती. पंढरपूरमधून काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष या नात्याने राजाभाऊ चळेकर यांनी भालके यांचा प्रचार करणे अपेक्षित होते. मात्र, चळेकर यांनी भालके यांचा प्रचार करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल सावंत यांचा प्रचार केला होता.
ॲड राहुल घुले यांच्या बद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यावर आता मंगळवेढा शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ॲड राहुल घुले यांना काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.





