Pranit More : कॉमेडीच्या नावाखाली हद्द पार.! आधी 370 ची बिर्याणी, आता मृतदेहावर अश्लील विनोद; प्रणित मोरेसह डॉ. सेजल पवार विरोधात गुन्हा दाखल
प्रणित मोरेच्या एका स्टँडअप शोदरम्यान झालेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सेजल पवार हिने मृत रुग्णाच्या मृतदेहासंदर्भात केलेल्या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला.

Pranit More : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील एका वादग्रस्त व्हिडिओनंतर निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागाने प्रणित मोरे, शोमधील प्रेक्षक हिमांशू जांगरा आणि वैद्यकीय विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अश्लील आणि महिलांबाबत अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. तिघांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालयाशी संबंधित निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ (MARD) ने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित विद्यार्थिनी सेजल पवार ही केईएम मार्डची सदस्य नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रणित मोरेच्या एका स्टँडअप शोदरम्यान झालेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सेजल पवार हिने मृत रुग्णाच्या मृतदेहासंदर्भात केलेल्या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि या प्रकरणाची व्यापक चर्चा सुरू झाली. त्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने या प्रकरणाची दखल घेत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.
“सेजल पवार मार्डची सदस्य नाही”
केईएम मार्डने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “केईएम मार्ड ही निवासी डॉक्टर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची अधिकृत संघटना आहे. सध्याच्या वादाशी संबंधित व्यक्ती ही एमबीबीएसची पदवीपूर्व विद्यार्थिनी असून ती आमच्या संघटनेची सदस्य नाही.”
तसेच, संबंधित विद्यार्थिनी केईएम वैद्यकीय परिवाराचा भाग असल्याने या घटनेबाबत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकता, नैतिक आचारसंहिता आणि देहदान करणाऱ्या व्यक्तींप्रती सर्वोच्च आदर राखणे ही मूलभूत मूल्ये आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करणाऱ्या व्यक्तींचे योगदान अमूल्य असून त्यांच्याबद्दलचा सन्मान कायम राखला गेला पाहिजे.
“संबंधित विद्यार्थिनीने केलेली विधाने अयोग्य होती. ती वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांकडून अपेक्षित असलेल्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, याची आम्हाला जाणीव आहे,” असेही निवेदनात म्हटले आहे.
हे देखील वाचा… Pranit More : 370 ची बिर्याणी पडली महागात.! आधी ट्रोलिंग, आता थेट कंपनीतून हकालपट्टी; प्रणित मोरेने घेतला धक्कादायक निर्णय
“माफी मागितल्यानंतरही ट्रोलिंग सुरू”
मार्डच्या म्हणण्यानुसार, संबंधित विद्यार्थिनीने सार्वजनिकरित्या खेद व्यक्त करत माफी मागितली आहे. त्यामुळे तिच्या वक्तव्याशी असहमती असली तरी त्यानंतर सुरू झालेली वैयक्तिक बदनामी, ऑनलाइन शिवीगाळ आणि लक्ष्य करून केलेला छळ योग्य नसल्याचे संघटनेचे मत आहे.
एखाद्याच्या वक्तव्याची जबाबदारी निश्चितच असते. मात्र, त्यानंतर सुरू झालेला ऑनलाइन छळ आणि वैयक्तिक पातळीवरील हल्ले हे परिस्थितीला सुसंगत नाहीत,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच केईएम मार्डने सार्वजनिक चर्चेत संयम आणि जबाबदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सायबर विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित व्यक्तींना समन्स पाठविण्यात आले आहेत. चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विनोदाच्या मर्यादा आणि व्यावसायिक जबाबदारी या मुद्द्यांमुळे हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.






