Prakash Mahajan : ज्यांच्या विरोधात मोर्चे काढले, तेच भाजपसोबत सत्तेत; मनसे नेते प्रकाश महाजन यांची टीका

छत्रपती संभाजीनगर : गोपीनाथ मुंडे यांनी चळवळीतून उभा केलेला पक्ष हा आता व्यावसयिक झाला आहे. विशेष म्हणजे त्यांचे शिष्य समजल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी पक्षाची ही अवस्था केली याची खंत आहे. मुंडेंनी ज्यांच्याविरोधात मोर्चे काढले तेच आज भाजपसोबत सत्तेत आहेत, अशी खंत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ११ व्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाजन यांनी भाजपच्या धोरणावर जोरदार टीका केली.
प्रकाश महाजन म्हणाले की, पूर्वी चळवळीत काम करणारे लोक भाजपमध्ये आणले जायचे. गोपीनाथ मुंडे हे स्वतः चळवळीतून आलेले नेते होते. तसेच चळवळीतील सर्वच नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. आज भारतीय जनता पक्षाची अवस्था पाहिल्यावर खंत वाटते. आता भ्रष्टाचारातून भाजपात एन्ट्री मिळते. अशोक चव्हाण, अजित पवार , छगन भुजबळ यांच्यासारखे अनेक लोक आज भाजपसोबत आहेत.
संभाजीनगरमध्ये सार्वजनिक सिंचन घोटाळ्यासंदर्भात एक मोर्चा निघाला होता. त्यात गोपीनाथ मुंडे यांचे डोके फुटले होते. ज्याच्या विरोधात तो मोर्चा निघाला होता, त्या नेत्याच्या बाजूला आज देवेंद्र फडणवीस बसतात हे दुर्दैव आहे. संघर्षाच्या वेळी अनेक लोक भाजपसोबत होते. पण सत्ता आल्यानंतर ते कुठेच नाहीत. त्यामुळे भाजप आता व्यावसायिक पक्ष झाला आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, आमचे वडील हे काँग्रेसच्या विचारसरणीचे होते. मुंडे आमच्याकडे आले की पहिले त्यांना भेटायचे. त्यावेळी आमचे वडील त्यांना म्हणायचे की गोपीनाथ, तू यांच्या नादी लागू नकोस. तू काँग्रेसमध्ये जा, मुख्यमंत्री होशील. पण दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे हे मुख्यमंत्रिपदापासून फक्त एकच पाऊल मागे राहिले. सुरुवातीपासून आव्हानाला सामोरं जायचा स्वभाव होता. त्यांनी कधीही आव्हानाला पाठ दाखवली नाही असं प्रकाश महाजन म्हणाले.





