Prakash Mahajan on Eknath Shinde । राज्य सरकारने नुकतीच वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा सध्या चांगलीच वादात सापडली आहे. या मुद्द्यावरुन अनेकजण शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत आहेत.दोन दिवसापूर्वी अभिनेत्री केतकी चितळेनी महायुती सरकारवर टीका केल्यानंतर आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्यांना मदत करणे योग्य नाही, अशी टिप्पणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. याविषयी प्रकाश महाजन यांनी,” वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा जो शासन निर्णय घेतला आहे, या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करते. वक्फ बोर्ड ही घटनाबाह्य संस्था आहे. वक्फ बोर्ड एकप्रकारे रद्द करायला पाहिजे. या देशाचे कायदे या बोर्डाला लागू होत नाहीत. वक्फ बोर्डाने जर एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर त्या संबंधित व्यक्तीला न्यायालय जाता येत नाही, वक्फ बोर्डाकडे जावे लागते. नरेंद्र मोदी यांना या लोकसभेला पुरेसं पाठबळ जनतेने दिलं नाही. नाहीतर हा वक्फ बोर्डच रद्द करण्यात आला असता”, असे म्हटले. …पण दाढी वाल्याला मदत करणे अयोग्य Prakash Mahajan on Eknath Shinde । पुढे त्यांनी,”लोकसभा निवडणुकीत मतं मिळाली नाहीत म्हणून राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजाचे लांगूनचालन केले जात असेल तर ते योग्य नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात वक्फ बोर्डाची बळकटी करण्यासाठी हा निर्णय घेतला. पण मग हे सरकार हिंदूंची वळकटी करणार का?, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढी वाल्याला मदत करणे योग्य नाही, असे महाजन यांनी म्हटले. संघ आणि भाजपवर मनसेने बोलणे योग्य नाही Prakash Mahajan on Eknath Shinde । दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ नियतकालीकातून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले होते. याची चांगलीच चर्चा झाली होती. याविषयी प्रकाश महाजन यांनी, “संघ आणि भाजप यांच्यातील आपसातल्या संबंधावर मनसेने बोलणे योग्य नाही.जर संघ असं बोलत असेल तर भाजपला आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जर संघ टीका करत असेल इतर कोणी भाजपवर टीका करण्याची गरज नाही. संघाने जर भाजपला सल्ला दिला असेल तर तो सल्ला नसतो आदेश असतो,” असे म्हटले.