‘वंचित’चा इन्ट्रीलाच धमाका! संजय राऊतांसमोरच प्रकाश आंबेडकर असं काही बोलून गेले…

Prakash Ambedkar on INDIA bloc – लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचं नाही या इराद्यासह काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशभरातील २६ पक्ष ‘इंडिया’ नावाखाली एकवटले होते. मात्र निवडणुकांपूर्वीच या आघाडीला तडे गेले आहेत.
बिहारमधून नितीश कुमार, पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी, पंजाबमधून केजरीवाल यांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली आहे. नितीश कुमार तर थेट एनडीएमध्येच सामील झाले आहेत. अशातच आज प्रकाश आंबेडकर यांनी, इंडिया आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुंबई येथे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेचा आज वंचित बहुजन आघाडी अधिकृतरीत्या भाग झाली. प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. मात्र यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी, इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली असं थेट विधान केलं आहे. माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलं आहे. विशेष म्हणजे यावेळी इंडिया आघाडीचे खंदे समर्थक संजय राऊत यांच्या समोरच त्यांनी हे विधान केलं आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? | Prakash Ambedkar on INDIA bloc
“इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश यादव आणि काँग्रेस हे शेवटचे मित्रपक्ष राहिले होते. माझ्या माहितीप्रमाणे दोघेही वेगळे झाले आहेत. दोघे वेगळ्या मार्गाने चाललेत अशी माझी माहिती आहे. तसं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण सत्य परिस्थिती तशी आहे.” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये | Prakash Ambedkar on MVA
यावेळी बोलताना आंबेडकर यांनी, “मविआ आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये हे आमचं बैठकीत ठरलं आहे. आम्ही ही दक्षता घेऊ. त्यामुळे ताक जरी असलं, तरी फुंकून फुंकून प्यायचं असं मी ठरवलंय. जागावाटप हा आमचा पुढच्या टप्प्याचा मुद्दा असेल. पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा आम्ही घेतला आहे. त्यावर सध्या निम्मी चर्चा झाली असून निम्मी चर्चा बाकी आहे.” असं खोचक वक्तव्य देखील केलं.
इतर महत्वाच्या बातम्या
एकीकडे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी अन् दुसरीकडे आमदार हैदराबादेत…
‘कमरेत लाथे’ची भाषा करणाऱ्या गायकवाडांना भुजबळांनी करून दिली जुनी आठवण…





