‘मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत, त्यांना कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये…’; प्रकाश आंबेडकर यांचा खोचक टोला

Prakash Ambedkar। PM Modi – देशातील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या टप्प्यातील प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर पंतप्रधान मोदी कन्याकुमारी येथे पोहोचले. ते समुद्रात बांधलेल्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये 45 तास म्हणजे 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यानस्थ राहणार आहेत. आज त्यांच्या ध्यानाचा दुसरा दिवस आहे.
मोदींच्या ध्यानधारणेची अनेक छायाचित्रे समोर येत आहेत. फोटोंमध्ये पीएम मोदी भगवा कुर्ता आणि गमछामध्ये दिसत आहेत. स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यासमोर बसून ते ध्यान करत आहेत. त्याच्या हातात जपमाळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलजवळ सूर्यदेवाला अर्घ्य दिले. त्यानंतर दोन दिवस ध्यानधारणा सुरू केली. मोदींनी सर्वात आधी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी हात जोडून प्रार्थना केली आणि जपमाळ घातली.
पंतप्रधान मोदींच्या या आध्यात्मिक भेटीसाठी कन्याकुमारीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी 2000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जोपर्यंत पंतप्रधान मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये थांबतील, तोपर्यंत कोणत्याही पर्यटकाला तेथे जाऊ दिले जाणार नाही.
दरम्यान, आता यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या ध्यानधारणेचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यापासून रोखण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे. काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींवर टीका केली आहे. मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मोदींना कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का देण्यात आलं नाही?, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
Modi is an excellent actor. I wonder why he was not nominated in Cannes this year.
Not so long ago, Modi equated himself with God.
If he indeed a God, then who is he meditating to connect with!?घोंचू! https://t.co/qZDJbf0T9q pic.twitter.com/aRUhTz6I8k
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 31, 2024
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा खोचक टोला लगावला आहे. “मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही? काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत:ची देवासोबत तुलना केली होती. जर ते खरोखरच देव असतील, तर ते स्वत:ला कोणाशी जोडण्यासाठी ध्यान करत आहेत?’, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.





