“प्रज्वल रेवन्ना यांना भारतात येताच अटक केली जाणार”; कर्नाटकच्या मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

Prajwal Revanna| महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनंतर फरार झालेला विद्यमान खासदार प्रज्वल रेवन्ना भारतात येताच त्यांना अटक केली जाईल. मात्र, अटक कुठे करायची याचा निर्णय विशेष तपास पथक (एसआयटी) घेईल, असे कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वरा यांनी स्पष्ट केले आहे.
पत्रकारांनी परमेश्वर यांना विचारले की, रेवन्ना यांना फ्लाइटमध्ये चढताच अटक केली जाईल की, ते भारतात येण्याची वाट पाहतील. यावर बोलताना ते म्हणाले की, “याचा निर्णय एसआयटी घेईल. एसआयटी त्यांच्या पद्धतीने काम करेल. रेवन्ना यांना कधी आणि कशी अटक करायची, हे एसआयटीलाच ठरवायचे आहे. प्रज्वल रेवन्ना 31 मे रोजी तपास पथकासमोर हजर झाले नाहीत तर त्यांना परदेशातून आणले जाईल यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल. ”
रेवन्ना यांच्या व्हिडीओबाबत त्यांनी सांगितले की, “मी तो पाहिला असून त्याने हा व्हिडिओ का बनवला हे माहित नाही. रेवन्ना यांच्याविरोधात यापूर्वीच ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. याशिवाय एसआयटीनेही नोटीस दिली आहे. ते परतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल. आता याप्रकरणी आरोपपत्रही दाखल होणार आहे. या प्रकरणाचे सत्य काय ते पाहावे लागेल. याबाबत सखोल तपास सुरू आहे.”
प्रज्वल रेवन्नाचे अनेक व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस सरकारने 28 एप्रिल रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली होती. मात्र अद्याप ते एसआयटी समोर हजर झाले नाही. त्यानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) मार्फत एसआयटीने विनंती केल्यानंतर इंटरपोलने ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी केली होती.
माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले – प्रज्वल रेवन्ना
अलीकडेच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये प्रज्वल रेवन्ना यांनी कुटुंबीय आणि जेडीएस कार्यकर्त्यांची माफी मागितली होती. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचे ते म्हणाले. देश सोडल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर, खासदार प्रज्वल रेवन्ना म्हणाले की, ते एसआयटीच्या तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत आणि 31 मे रोजी त्यांच्यावरील खटल्यांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर हजर होतील.
एक व्हिडिओ जारी करताना प्रज्वल म्हणाले की, “मी स्वत: शुक्रवार, 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर हजर राहीन आणि तपासात सहकार्य करेन. माझ्यावरील सर्व आरोपांना मी उत्तर देईन. माझा न्यायालयावर विश्वास आहे. 26 एप्रिलला निवडणुका झाल्या तेव्हा माझ्याविरुद्ध कोणताही खटला नव्हता किंवा कोणतीही एसआयटी स्थापन झाली नव्हती. माझा परदेश दौरा आधीच ठरलेला होता.”
“मी परदेश दौऱ्यावर असताना मला आरोपांची माहिती मिळाली. राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते सत्य जाणून न घेता माझ्याविरोधात बोलू लागले. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले. मी शुक्रवार 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर हजर राहून तपासाशी संबंधित सर्व माहिती देईन. तपासाला माझा पाठिंबा असेल. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे,” असे त्यांनी व्हिडिओत म्हंटले.
प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कोणता आरोप?
दरम्यान, 33 वर्षीय प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत आणि त्यांचे तब्बल सुमारे तीन हजार सेक्स व्हिडीओ प्रसारीत झाले आहेत. त्यांनी शेकडो महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा:
“पाकिस्तानने १९९९ साली लाहोर कराराचे उल्लंघन केलं”; कारगिल युद्धाच्या 25 वर्षानंतर पाकिस्तानची कबुली





