Prajakta Mali : ‘चिकी चिकी बुबूम बुम…’; सुरेश धस प्रकरणानंतर प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा घेणार प्रेक्षकांची भेट !

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि भाजपचे आमदार सुरेश धस हे दोघे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्रीने त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. पत्रकार परिषद घेऊन प्राजक्ताने धस यांचा चांगलाच समाचार घेतला होता. मात्र, प्राजक्ता माळी यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धस यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
दरम्यान, अश्यातच आता अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये स्वप्नील जोशी , प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात ही नामवंत कलाकार मंडळी असणार आहेत. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ असं या सिनेमाचं नाव आहे. नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचे गमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यात स्वप्नीलचा हटके लूक दिसतोय तर बाकीचे कलाकार घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत दिसतायेत. त्यामुळे ही भानगड काय आहे? हे समजायला मार्ग नाही. चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज आणि धमाल मनोरंजनाची ट्रीट देणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट येत्या 28 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. सध्या रसिक प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.





