Praful Patel : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपद प्रफुल पटेल यांच्याकडे जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावरती मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससारख्या रांगड्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पाटील असायला हवा पटेल नको, असे म्हटले होते. यानंतर प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी पक्ष बळकावून भाजपच्या दावणीला बांधणार, अशी वातावरणनिर्मिती झाली होती. या सगळ्या आरोपांवरती पटेल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष माझ्याशिवाय अन्य व्यक्ती होईल, असे स्पष्ट केले आहे. पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मी सोडून अन्य कोणतीही व्यक्ती असेल. ती व्यक्ती योग्य असेल. मात्र, काहीजण उलटसुलट चर्चा करत आहेत. यामध्ये काही तथ्य नाही. मी कधीही राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नव्हतो. मी किंवा आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याने मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले का? असे त्यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता, ते यावरती वैतागल्याचे दिसून आले. राज ठाकरे, ते माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का, ते आमच्या पक्षात आहेत का? माझ्या पक्षाचा विधिमंडळ नेता आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा, हे राज ठाकरे ठरवणार का? असा प्रश्न त्यांनी केला. आम्ही आमच्या पक्षात काय करावे, हे ते सांगत आहेत. अजित पवार यांच्यानंतर पक्षाचा नविन नेता निवडण्याची जबाबदारी कार्याध्यक्ष म्हणून माझ्यावर आहे. आम्ही योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही सध्या विधिमंडळ नेता आणि उपमुख्यमंत्र्याची निवड केली आहे. सर्व काही ठीक झाल्यावर आम्ही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या विषयाकडे लक्ष देऊ. अजित पवार यांच्यानंतर आमच्या पक्षाची नेमून दिलेली प्रक्रिया पार पाडणे माझी जबाबदारी आहे. असे पटेल यांनी म्हटले आहे. तपासामध्ये जे काही तथ्य आहे ते बाहेर येईल : पटेल उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काहींनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे. दादांच्या विमानाचा अपघात झाला, मी विमान वाहतूक खाते मंत्री राहिलो आहे, माझ्या काळात एयरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो ही स्वायत्त संस्था आहे, ही संस्था अशा घटनांची, अपघातांची चौकशी करण्यासाठी आम्ही स्थापन केली होती, त्यांच्याकडे हे प्रकरण दिले आहे. त्यांनी ब्लॅक बॉक्स रिकव्हर केला असून, त्यामधून बऱ्याच लाईट डेटा, रेकॉर्डिंग आणि पायलट शेवटचे काय बोलले ते रेकॉर्ड झालेले असतात. दुसरा माझ्या अभ्यासाप्रमाणे, आम्ही व्हिडिओ फुटेज बघितले. हे पाहून फारच जास्त प्रश्न पडत आहे, की असे कसे होऊ शकते, याची सगळी सखोल चौकशी होईल. त्यामुळे काय झाले हे ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंग तपासानंतर आपल्याला कळेल, तपासामध्ये जे काही तथ्य आहे ते बाहेर येईल, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे. पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी, अमित शाहांची भेट राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि शाहांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्याशी पाच ते सहा मिनिटे चर्चा केली आहे. Praful Patel Meet PM Narendra Modi उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांची एक बैठक घेतली. त्यावेळी मोदींनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर प्रफुल पटेल हे मोदी आणि अमित शाहांना भेटले आहेत. प्रफुल पटेल यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली.