Pradeep Purnekar : ठाकरे गटाच्या नेत्यावर ऑफिसमध्ये घुसून गोळीबार; कुटुंबाचा शिंदे गटाच्या नेत्यावर गंभीर आरोप
Pradeep Purnekar : दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Pradeep Purnekar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ९.३० वाजता ठाण्यातील मानपाडा येथील गणेशनगरमध्ये त्यांच्या कार्यालयात त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनंतर ठाणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीला, तर एक गोळी त्यांच्या मांडीला लागली. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रदीप पूर्णेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नेमका कसा घडला हल्ला?
घटनेच्या वेळी प्रदीप पूर्णेकर हे मानपाडा येथील गणेश नगर परिसरात असलेल्या आपल्या कार्यालयात उपस्थित होते. यावेळी कार्यालयात इतरही काही कार्यकर्ते उपस्थित होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास स्कूटरवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी थेट त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्या दिशेने लागोपाठ ४ राऊंड फायर केले.
यातील दोन गोळ्या थेट प्रदीप पूर्णेकर यांच्या छातीत लागल्या. गोळ्यांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूर्णेकर यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, छातीत गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दोघांना अटक
घटनेची माहिती मिळताच ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी मानपाडा आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यास सुरुवात केली आहे. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोर कैद झाले आहेत.
तोंडाला रुमाल बांधून हे हल्लेखोर प्रदीप पूर्णेकर यांच्या ऑफिसजवळ येताना दिसून आले आहेत. त्यानुसार आता पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कलुसिया हे चौघे संशयित असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप
प्रदीप पुर्णेकर यांचे बंधू जयनाथ पुर्णेकर आणि सुपुत्र राम पुर्णेकर यांनी शिवसेना नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. गणपतीपासून हे सर्व रेकी करत होते, असंही जयनाथ पुर्णेकर यांनी सांगितले. त्यामुळे ही हत्या राजकीय वैमनस्यातून घडली की, यामागे आणखी वेगळे कारण आहे? याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे.
हेही वाचा:





