SSC-HSC Exam: राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
SSC-HSC Exam : दहावी-बारावी परीक्षा शुल्क घेऊन रिफंड करण्यापेक्षा आधीच घेऊ नका, अशी भूमिका मांडण्यात आली.

SSC-HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा होणार आहे. त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार ही सवलत लागू करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित बारावी आणि दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना बोर्डाकडून परिपत्रक काढून देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षा शुल्क घेऊन रिफंड करण्यापेक्षा आधीच घेऊ नका, अशी भूमिका मांडण्यात आली होती.
मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांबद्दल हा महत्त्वाचा आदेश काढण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, दुष्काळाचा परिणाम केवळ शेती आणि शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसतो. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असतो. उत्पन्न कमी झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण होत असते.
आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण ठरलाय. दुष्काळग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा:





