Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या दुःखाशी देणं-घेणं आहे की नाही? उद्धव ठाकरे यांचा संताप; मुख्यमंत्र्यांकडे केल्या पाच प्रमुख मागण्या
Uddhav Thackeray : केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

Uddhav Thackeray’s five key demands : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या भीषण दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा हवालदिल झाला असून मोठ्या संकटात सापडला आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागांना भेट देत पाहणी दौरा केला. या दौऱ्यात शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.
केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. अशातच सरकारने गेल्यावर्षी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी साडेतीन लाख रुपयांची घोषणा केली होती. मात्र, यातील प्रत्यक्ष मदत किती शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली, याची माहिती महाराष्ट्राला मिळायला हवी, अशा शब्दांत हल्लाबोल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत.
‘या’ आहेत पाच प्रमुख मागण्या
- गेल्या वर्षी शेतकऱ्यांना किती पॅकेज जाहीर केलं, ते किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं याची माहिती द्या.
- आता जी कर्जमाफी करण्यात आली. त्याचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला याची यादी द्या.
- सरकारने पीक विमा योजना गुंडाळली आहे. दरवर्षी शेतकरी पिक विम्यासाठी नोंद केली जाते. त्यात अर्ध्याहून अधिक जास्त शेतकऱ्यांनी नोंद केलीच नाही. पीक विमा कंपन्यांच्या मनमानीमुळे कुठे ५ रुपये, कुठे २१ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. या गुन्हेगार कंपन्यांना शिक्षा झाली पाहिजे.
- सोलापूर, संभाजीनगर विदर्भात तातडीने कॅबिनेट मिटिंग घ्यायला हवी.
- येत्या दोन ते तीन दिवसात विशेष अधिवेशन बोलवा.
उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
दुष्काळी दौरे नुसते काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का? दुष्काळी दौरे तुम्ही जे काय करता आहात, त्याच्यामध्ये खरोखर तुमच्यासोबत जे काही अधिकारी आहेत, तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, तुमचे सहकारी मंत्री आहेत, त्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाशी देणं-घेणं आहे की नाही, हे आम्हाला काही कळत नाही, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
Love and War : रणबीरच्या नव्या अवताराने वेधले लक्ष; ‘लव्ह अॅन्ड वॅार’मधील दमदार फर्स्ट लूक समोर





