Prada Tote Bag : कोल्हापुरी चपलेनंतर ‘प्राडा’ने ढापली लालपरीची फ्लोअर डिझाईन; नवीन बॅगची किंमत ऐकून उडतील होश

Prada | Tote Bag : काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने मिलान मध्ये आपले Men’s Spring/Summer 2026 कलेक्शन सादर केले होते. या शोमध्ये मॉडेल्सच्या पायात जी चप्पल दिसली, ते अगदी भारतातील प्रसिद्ध ‘कोल्हापुरी चप्पल’सारखी होती.
या चप्पलांची किंमत जवळपास 1 लाख रुपये असल्याचं सांगितलं, तर भारतात अशीच चप्पल सुमारे 250 रुपये ला सहज मिळते. याच कोल्हापुरी चप्पलची नक्कल केल्यामुळे प्राडा ब्रँड वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं होतं.
मात्र, असं असताना देखील आता पुन्हा एकदा नवीन उत्पादनामुळे प्राडा चर्चेत आला आहे. प्राडाच्या नवीन ‘टोट बॅग’ची तुलना भारतातील एसटी बसच्या फ्लोअरच्या डिझाइनशी केली जात आहे. आता या ब्रँडने पुरुषांसाठी एक नवीन ‘टोट बॅग’ बाजारात आणली आहे, ज्यावर एसटी बस किंवा भारतातील रेल्वेच्या फ्लोअरच्या डिझाइनसारखी प्रिंट आहे.
धातूसारखी चमक असलेल्या या बॅगला हॉट-स्टॅम्प्ड लेदरची किनार आहे आणि त्यात वेगळा वॉटर बॉटल कम्पार्टमेंट आहे. मिनिमलिस्टिक आणि आधुनिक शैली दाखवण्याचा प्रयत्न असून या बॅगचा पॅटर्न एसटी बस किंवा रेल्वेच्या डब्यातील फ्लोअर सारखा असल्याचे नेटकऱ्यांनी लागेच ओळखले आहे.
या बॅगची किंमत विशेष आणि चर्चेत आहे, ती 2.73 लाख रूपये आहे. त्यामुळे आता हा लक्झरी ब्रँड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर देखील या नवीन ‘टोट बॅग’चे फोटो व्हायरल झाले असून, नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
ट्विटरवर एकाने लिहिले आहे, “आम्हाला क्रेडिट हवे आहेत #mumbailocals”, तर दुसऱ्याने मस्करीत लिहिले आहे, “प्राडा म्हणजे तो एक्स-प्रियकर जो भारतावर फिदा आहे” आणखी एकाने म्हटले आहे, “ही डिझाइन नाही, तर रेल्वेच्या फ्लोअरची हुबेहूब नक्कलच आहे.” अश्या अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.






