Prabhat Road: पालिकेच्या रस्त्यावर खासगी कब्जा? प्रभात रस्त्यावर बॅरिकेट लावून रस्त्याची एक लेन बंद
Prabhat Road: अतिक्रमण विभागाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेला प्रकार दुर्लक्षित; महापालिका प्रशासनाकडे बॅरिकेट्स उभारणीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Prabhat Road – सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणांवर सातत्याने कारवाईचे दावे करणाऱ्या महापालिकेच्या नाकावर टिच्चून प्रभात रस्त्यावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) शेजारील मुख्य रस्त्यावर एका खासगी इमारतीतून वाहनांची ये-जा सुलभ करण्यासाठी थेट रस्त्यावर बॅरिकेट उभारून रस्त्याची एक लेन बंद केली आहे.
त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावर बॅरिकेट उभारण्यास परवानगी कोणी दिली, याबाबत कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडेही नाही. एकीकडे महापालिकेचा अतिक्रमण विभाग शहरभर कारवाई केली जाते.मुख्य रस्त्यावर उभारलेले हे बॅरिकेट संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेस कसे पडले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
रस्त्यांची देखभाल, अतिक्रमण नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी या परिसरातून नियमित ये-जा करत असतानाही हा प्रकार दुर्लक्षित राहिल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज एका इमारतीसाठी रस्त्याची एक लेन बंद केली जात असेल, तर उद्या प्रत्येक सोसायटी किंवा व्यावसायिक आस्थापना स्वतःच्या सोयीसाठी सार्वजनिक रस्त्यावर अशाच प्रकारे कब्जा करू लागल्यास सार्वजनिक रस्त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.





