48 वर्षांपुर्वी प्रभात : काळाबाजारवाल्यांविरुद्ध सामाजिक बहिष्कार घाला

मुंबई, ता. 7 – काळाबाजारवाल्यांविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून जनतेने काळाबाजारवाल्यांवर सामाजिक बहिष्कार घालावा, असे उद्गार केंद्रीय संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनी आज येथे काढले. ते पुढे म्हणाले, काळाबाजार व चुकीची वाटपव्यवस्था यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये अन्यायकारक वाढ झाली आहे.
शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग
पुणे – पुणे शहरातील आज अनेक भागांत कचरा पेट्यांभोवती कचऱ्याचे डोंगर तयार झाले होते. अनेक भागांत इतका कचरा होता की त्यामुळे रस्तेही बंद झाले होते. शनिवार, नारायण, सदाशिव, कसबा या पेठांत चक्कर मारली असता हे कचऱ्याचे ढीग आढळून आले. कचरापेटीच्या आजूबाजूस राहणारी मंडळी दुर्गंधीमुळे वैतागून गेली आहे. शनिवार पेठेतील आयडियल हायस्कूल जवळील पेटीतील कचरा शाळेच्या दारापर्यंत पसरला आहे. विजय टॉकीजसमोरील कचरा रस्ताभर झाला आहे.
बांगला देशात “उर्दू’ चित्रपटांना बंदी
डाक्का – पाकिस्तानी राज्य शासनाच्यावेळी तयार करण्यात आलेले उर्दू चित्रपट दाखविण्यास बंदी करण्याचे बांगला देश सरकारने ठरविले आहे. पाकिस्तानी संस्कृतीशी जवळीक असलेल्या काही बंगाली चित्रांवरही बंदी घालण्यात येणार आहे. ही बंदी बंगाली संस्कृतीचे रक्षण करण्याचे हेतूने घालण्यात आली आहे.
तिसऱ्या दिवशी युद्धाचे पारडे फिरले
तेल अवीव – इस्रायली सैन्याच्या पलटणी आज सीरियाच्या प्रदेशात शिरल्या. त्यामुळे माघार घेऊन सीरियाच्या सैन्याची पळापळ सुरू झाली, अशी बातमी इस्रायल स्टेट रेडिओवरून सांगण्यात आली. सुवेझ कालव्यावर इजिप्तने आक्रमण करण्यासाठी बांधलेले सर्वच्या सर्व म्हणजे 11 पूल उद्ध्वस्त केले व सिनाई वाळवंटांत कैचीत सापडलेल्या इजिप्तच्या सैन्याला इस्रायली सशस्त्र दल व हवाई दल एकत्र गोळा करीत आहे. इजिप्त व सीरिया अजूनही आगेकूच करीत असल्याचे सांगण्यात आले.




