47 वर्षांपुर्वी प्रभात: भारत-अमेरिका संबंध सद्भावनेनेच दृढावतील

सांगली – भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेत वा अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतात राजदूत नेमणे हा राजकीय व्यवहार असेल आणि ते फक्त राजनैतिक धोरणांतून उभय देशात कितपत संबंध ठेवावेत एवढ्यापुरतेच मर्यादित मार्गदर्शन आपापल्या सत्ताधिशांना करू शकतात. पण गतवर्षी अमेरिकेस भेट दिलेले भारतीय शिष्टमंडळ व सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकन शिष्टमंडळच खरे राजदूत आहेत. ते या प्रतिविधीमंडळातील लोकच दोन्ही देशांतील जनतेच्या सद्भावना-सदिच्छांची देवाणघेवाण करू शकतात, असे उद्गार अमेरिकन डॉ. जोसेफ सोल्डन यांनी येथे काढले. यांत्रिक शोधामुळे जगाचे सर्व भाग एकमेकांच्या अत्यंत निकट येऊ लागले आहेत.
पाकला भारताशी मैत्रीचे संबंध हवेत
नवी दिल्ली – पाकिस्तान व अमेरिका यांच्यामध्ये होणाऱ्या बोलण्याचा भारत-पाक संबंधावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, असे पाक पंतप्रधान भुट्टो यांनी रेडिओ पाकवर बोलताना सांगितले. भारताशी हळूहळू संबंध सुधारावेत अशी पाकिस्तानची फार इच्छा असल्याचेही भुट्टो यांनी सांगितले.
व्हिएतनाममध्ये अमेरिकचा पुन्हा लष्करी हस्तक्षेप
नवी दिल्ली – व्हिएतनाममध्ये पुन्हा लष्करी हस्तक्षेप करण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. व्हिएतनामच्या थिऊ सरकारला वाढीव लष्करी मदत देण्याचेही अमेरिका विचार करीत आहे, असे उत्तर व्हिएतनामचे परराष्ट्रमंत्री न्यूयेन यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याशी बोलताना सांगितले.





