सुदानमधील दुसरे बंडही मोडून काढले! कुवेत, दि. 11 – सुदान अध्यक्षाविरुद्ध एकाच आठवड्यात दुसर्या वेळी उठावाचा प्रयत्न झाला व तो फसला, अशी बातमी कुवेतमधील एका दैनिकाने अरब, राजनैतिक गोटाचा हवाला देऊन छापली आहे. पहिला उठाव गेल्या शुक्रवारी झाला. त्यात लिबियाचा हात होता. तो उठाव मोडून काढण्यात आला. त्यानंतर काल सकाळी स्थानिक वेळेप्रमाणे 10 वाजता पुन्हा उठाव झाला. बंडखोरांनी नभोवाणी केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या घरावरही त्यांनी चाल केली होती. यानंतर अनेक अधिकारी व अध्यक्षांचे प्रमुख संरक्षक यांना अटक करण्यात आल्याचे कुवेतच्या पत्राचे वृत्त आहे. आता कोकणी अकादमी स्थापणार मडगांव – 11व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य परिषदेने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने विद्यापीठीय स्तरांवर कोकणी अकादमी स्थापण्यात येणार आहे. कोकणीला स्वतंत्र साहित्यिक भाषा म्हणून साहित्य अकादमीची मान्यता लाभल्याने तिच्या विकासाची नवी कवाडे खुली झाली आहेत. ही अकादमी कोकणी भाषिक प्रदेशांत सांस्कृतिक पुनरुज्जीवन साधण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे अकादमीचे प्रवर्तक के के पै व चंद्रकांत केणी यांनी म्हटले आहे.