46 वर्षांपूर्वीचा प्रभात : ता. 25, माहे जुलै, सन 1977

अजूनही मानसिक स्वातंत्र्य मिळालेले नाही
पुणे, दि. 24 – आपण मानसिक स्वातंत्र्य अजून संपूर्णपणे मिळवू शकलो नाही. जेव्हा आपले दैनंदिन कामकाज मातृभाषेत चालेल, शिक्षण मातृभाषेत होईल आणि सर्वांना जोडणाऱ्या समान भाषेचाही वापर होईल, तेव्हाच हे मानसिक स्वातंत्र्य पूर्ण होईल, असे उद्गार पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मराठी विश्वकोशाच्या प्रकाशनप्रसंगी काढले.
मातृभाषेशिवाय मनुष्य आपले विचार पूर्णपणे प्रकट करू शकत नाही. आपली संस्कृती आपल्या भाषेत आहे. जर आपली भाषा आपल्याला आली नाही तर ही संस्कृती आपण जीवनात कशी उतरवू शकू? असा सवाल त्यांनी केला.
संस्कृतसारखी संपन्न भाषा जगात नाही
पुणे – संस्कृत इतकी सर्वात जुनी आणि संपन्न भाषा जगात कोठेही नाही. या भाषेतील आकर्षक-मोहक साहित्यही विपुल आहे. परंतु शिक्षण क्षेत्रात मात्र या भाषेला अद्याप म्हणावे तसे स्थान लाभलेले नाही याबद्दल मोरारजी देसाई यांनी खेद व्यक्त केला.
संस्कृत भाषेतील ज्ञानकोश ग्रंथाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. भाषिक प्रश्नावर आपण एकदम भावनेच्या आहारी जातो. परंतु या भाषा इतक्या संपन्न व सर्वार्थाने परिपूर्ण आहेत की त्यांच्याशी एक-दुसरीची स्पर्धा होणे शक्य नाही. तेव्हा दोष भाषांचा नसून आपला आहे.





