कर्नाटकमध्येही सत्तासंघर्ष सुरु होणार ?; ’45 आमदार आमच्या संपर्कात’ असल्याच्या भाजपच्या दाव्याने काँग्रेसमध्ये खळबळ

बंगळूर : सत्तासंघर्षाचा पेच आणि पक्षांमधील फुटीचे राजकारणाने महाराष्ट्रात गोंधळ सुरु आहे. तर अशीच काहीशी परिस्थिती सध्या कर्नाटकमध्ये निर्माण होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. कारण राज्यातील 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. नेत्याच्या या दाव्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भाजप राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष यांनी हा दावा केला आहे. त्यांनी ‘कॉंग्रेसचे ४५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. राज्यातील कॉंग्रेस सरकार कोसळेल, अशा भ्रमात भाजप असल्याची टीका करून संतोष यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याच्या प्रतिक्रिया कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी उपरोधिकपणे बोलताना, संतोष यांनी सर्व काँग्रेस आमदारांशी संपर्क साधला, तर आम्हाला आनंदच होईल. अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा म्हणाले की, संतोष यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पराभवामुळे निराश होऊन हे विधान केले आहे. राज्य सरकार पडेल या भ्रमात भाजप असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. ‘ऑपरेशन कमळ’ची आम्हाला नेहमीच काळजी असते. पण आता तसे वातावरण नसल्याचे ते म्हणाले.
उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनीही संतोष यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेऊन भाजपातील नाराज आमदारांना पक्षात टिकवून ठेवण्याचा हा त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले की, काँग्रेसच्या नगरपरिषद सदस्यांच्या संपर्कातही संतोष नाहीत. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास संतोषच जबाबदार होते. तर दुसरीकडे मंत्री प्रियांक खर्गे म्हणाले, ‘‘ऑपरेशन कमळ’साठी पैसा कुठून येतोय? याचे उत्तर संतोष यांनी द्यावे. तुम्हाला एक दिवस नाही, महिनाभर देऊ. ४५ नव्हे तर चार आमदार फोडून दाखवा. येडियुराप्पा यांना संतोष यांनीच तिकीट दिले नाही. त्याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे.’’ असे आव्हान त्यांनी दिले आहे.




