Poultry Business : तापमान ४० अंशांच्या पार, पोल्ट्री व्यवसाय धोक्यात! कोंबड्यांवर वाढत्या उष्णतेचा काय होतोय परिणाम?
Poultry Business : उन्हाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास पोल्ट्री उद्योगासमोर मोठे संकट; बाजारातील पुरवठ्यावर परिणाम होण्याची व्यावसायिकांची भीती.

Poultry Business – वाढलेल्या तापमानाचा मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसत असून अंडी उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने पोल्ट्री चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे कोंबड्यांमध्ये ताण वाढत असून पक्ष्यांचा मृत्यूदरही वाढला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक हैराण झाले आहेत. सध्या तापमान सतत ४० अंशांच्या पुढे जात असल्याने कोंबड्यांच्या खाद्य सेवनावर परिणाम होत आहे.
उष्णतेमुळे पक्षी कमी खाद्य घेत असल्याने अंडी उत्पादनात घट होत असल्याचे पोल्ट्री चालक सांगत आहेत.काही ठिकाणी कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होऊन अचानक मृत्यू होत असल्याने नुकसान वाढले आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारातील अंड्यांच्या पुरवठ्यावरही परिणाम होत असून खर्च मात्र वाढत चालला आहे.
पक्ष्यांना थंडावा मिळावा यासाठी शेडमध्ये पंखे, कूलर, पाण्याची फवारणी आणि अतिरिक्त औषधोपचार करावे लागत आहेत.त्यामुळे विजेचा आणि देखभालीचा खर्च वाढल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.उन्हाचा प्रादुर्भाव आणखी काही दिवस कायम राहिल्यास पोल्ट्री उद्योगासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
“उष्णतेमुळे कोंबड्या व्यवस्थित खाद्य घेत नाहीत.अंडी उत्पादन कमी झाले असून पक्ष्यांचा मृत्यूदर वाढला आहे.औषधे, पंखे आणि पाण्याच्या व्यवस्थेवर अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे.”
– मारुती बढेकर,पोल्ट्रीचालक, वैदवाडी.





