Pune District : चौफुला मुख्य चौकातील खड्डे धोकादायक
Pune District : खड्डा चुकविताना किंवा अचानक खड्ड्यात दुचाकी आदळल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चौफुला परिसरात मोठी लोकवस्ती असून, नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा आहे.

वरवंड : सातारा- शिरूर महामार्गावरील चौफुला येथील मुख्य चौकात पडलेले खड्डे सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून, या खड्ड्यांकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
चौफुला हा सातारा- शिरूर महामार्गावरील वर्दळीचा परिसर असून, या ठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.
मात्र, मुख्य चौकातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसह दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डा चुकविताना किंवा अचानक खड्ड्यात दुचाकी आदळल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चौफुला परिसरात मोठी लोकवस्ती असून, नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा आहे.
महामार्गावरील मुख्य चौकातच रस्त्याची अशी अवस्था असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित महामार्ग प्रशासनाने चौफुला मेन चौकातील खड्ड्यांची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने अपघाताची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





