पुणे | वैद्यकीय महाविद्यालयाचे होणार पोस्टमार्टम

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खासगी अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयामार्फत प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने डेव्हलपमेंट फी घेणे, यासह इन्स्टिट्यूशनल कोटा अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष कार्यालयाने दिले आहेत. याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यानुसार राज्यातील एकूण नऊ वैद्यकीय महाविद्यालयांची चौकशी होणार आहे. यामध्ये पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजसह तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत राज्यातील विविध सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस,बीडीएस अशा पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुमारे 15 टक्के जागा या इन्स्टिट्यूशनल कोट्यातून प्रवेशासाठी राखून ठेवल्या जातात.
मात्र, ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या शुल्क नियमन प्राधिकरणाकडून खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचे शुल्क ठरविले जाते. त्यामध्ये शैक्षणिक शुल्क तसेच विकसन शुल्क अर्थात डेव्हलपमेंट फीचा समावेश होतो.
इन्स्टिट्यूशनल कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी नियामित शुल्काच्या तीन पट शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित महाविद्यालयांनी या शुल्काची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
त्यानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणे अपेक्षित आहे. मात्र, दोन नियमित प्रवेश फेऱ्यांचा अभ्यास करता इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या जागा अनेक खासगी महाविद्यालयांमध्ये रिक्त दिसून येत आहेत.
या जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये गेले. मात्र, त्यांना विविध कारणे देत त्यांचे प्रवेश नाकारण्यात आले. त्यामुळे या जागा पहिल्या फेरीत आणि दुसऱ्या फेरीत रिक्त राहिल्या.
या संपूर्ण प्रक्रियेत महाविद्यालयांनी आर्थिक गैरव्यवहार केला की काय. या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयांची चौकशी करून त्यांच्या इन्स्टिट्यूशनल कोट्यातील प्रवेश प्रक्रियेचा अहवाल मागविण्यात यावा, अशी मागणी युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या महाविद्यालयांची चौकशी होणार…
१) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज २) श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज नऱ्हे, पुणे ३) माईर्स मेडिकल कॉलेज तळेगाव-दाभाडे, पुणे ४) अश्विनी मेडिकल कॉलेज, सोलापूर ५) एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज, लातूर ६) तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई ७) वेदांता मेडिकल कॉलेज, पालघर ८) डॉ.एन.वाय.तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कर्जत ९) प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च इस्लामपूर, सांगली
आम्ही तक्रार केलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची दोन सदस्यीय समितीकडून चौकशी करण्याचे आदेश दिले असून, त्याचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहे.
या संपूर्ण प्रकाराच्या तळाशी जाऊन मुजोर महाविद्यालयांवर कारवाई होईपर्यंत; तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्यात येईल. – कल्पेश यादव, सहसचिव, युवासेना




