Nagar | पुणे विद्यापीठाच्या बाबुर्डीतील उपकेंद्रात प्रवेश प्रक्रिया

नगर, (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून चार वर्षीय बी. एस. सी. डाटा सायन्स हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे, अशी माहिती उपकेंद्राचे सहायक कुलसचिव डॉ. शिवप्रसाद घालमे यांनी दिली.
नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील उपकेंद्राच्या नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.
डॉ. घालमे म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून विद्यापीठाने सध्याच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात युवकांना रोजगार प्राप्तीसाठी हा अतिशय चांगला अभ्यासक्रम सुरू केला आहे.
विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा उपकेंद्र विकास समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे यांनी हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. संदीप पालवे म्हणाले की, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने विशेष बाब म्हणून या अभ्यासक्रमाचे शुल्क कमी ठेवले आहे.





