वाघोलीत गरजू मुलींसाठी ‘सरोज भवन विद्यार्थिनी वसतिगृह’; प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे : समाजातील गरजू, अनाथ तसेच ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थिनींसाठी वाघोली येथे “सरोज भवन विद्यार्थिनी वसतिगृह” सुरू करण्यात आले आहे. दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट पुणे या संस्थेच्या माध्यमातून हे वसतिगृह सुरु झाले असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पुण्यातील महात्मा फुले पेठेतील दिशा परिवार ट्रस्ट ही संस्था गेली दोन दशके सामाजिक कार्यात सक्रिय असून, वसतिगृह, शैक्षणिक मदत, व्यक्तिमत्त्व विकास व मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी देण्याचे कार्य करत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वाघोली येथे मुलींसाठी सर्व सुविधा असलेले ‘सरोज भवन’ वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.
या वसतिगृहात अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील ११वी ते पदवी शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. निवडक मुलींना शिक्षणासोबतच वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी विविध उपक्रमही राबवले जाणार आहेत.
सरोज भवन विद्यार्थिनी वसतिगृह बालाजी पार्क, केसनंद रोड, वाघोली येथे आहे. गरजूंनी यावर संपर्क साधण्याचे आणि ९४२३४ ९२२३३ अधिकाधिक विद्यार्थिनींनी या वसतिगृहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिशा परिवार ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.





