कोल्हापुरात बॅनरबाजी! “राजा हारला काय जिंकला काय, राजा हा राजा असतो”

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेची आणि चुरशीची मानल्या गेलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. कोल्हापुरात महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर महायुतीकडून शुभेच्छांचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून आता सतेज पाटील समर्थकांकडूनही एकनिष्ठ असे सांगत ठिकठिकाणी फलक लावण्यात आल्याने पोस्टर वॉर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
कसबा बावडा परिसरात लावलेले फलक चर्चेचा विषय बनले आहेत. या फलकात आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या छायाचित्रांसह राजा हारला काय, जिंकला काय, राजा हा राजा असतो, असे सांगून सतेज पॅटर्न म्हणत निष्ठेत तडजोड नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसऱ्या एका फलकामध्ये आमचा साहेब घट्ट आहे असे सुचविण्यात आले. तर आणखी एका फलकामध्ये नवसाला पावला नाही म्हणून देव बदलायची सवय आम्हाला नाही, सदैव तुमच्यासोबत असे सांगत निष्ठा तुमच्यासोबतच असे सतेज पाटील समर्थकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी सतेज पाटील आणि धनंजय महाडिक गटामध्ये टोकाच्या राजकारणातून एकमेकांचा पराभव करण्याची ईर्ष्या दिसून आली होती. याचपार्श्वभूमीवर नादान है वो लोग, जो समंदर को सुखाना चाहते है, असा टोलाही एका फलकातून लगावण्यात आला आहे. एक कुस्ती हरली म्हणून खचत नाही, मैदानात कसं लढायचे हे त्याला नक्कीच माहिती असतं, असे सांगून समर्थकांनी सतेज पाटील यांच्या यांच्या सलग विजयाची आठवणही करून दिली आहे.





