केंद्राच्या धर्तीवर कुटुंब निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत सकारात्मक : शंभुराज देसाई

मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास केंद्र शासनाच्या धर्तीवर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि वैद्यकीय कारणास्तव कर्मचाऱ्याने सेवा निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करण्यासंदर्भात अभ्यासगटाद्वारे साकल्याने विचार करून शासनास शिफारस करण्यात आली असल्याचे व यासंदर्भात सकारात्मक असल्याचे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या सेवेत सन 2005 किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील त्रृटींचा अभ्यास करण्यासाठी वित्त राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटासमवेत कर्मचारी संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देसाई बोलत होते.
राज्य कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, अभ्यासगटात या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येईल. निवृत्ती वेतन योजनेतील त्रृटी आणि शासनावर येणारा आर्थिक भार यासदंर्भात अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले.




