पोर्शे अपघात प्रकरण : अल्पवयीनला सज्ञान ठरवून खटला चालवावा

पुणे, – कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून भरधाव मोटार चालविली. या अपघातात दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. मुलाला वाचविण्यासाठी त्याचे बांधकाम व्यावसायिक वडील, आई तसेच साथीदारांनी कट रचला.
ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले. गुन्हा गंभीर असल्याची माहिती अल्पवयीनाला माहिती होती. त्यामुळे अपघात करणाऱ्या अल्पवयीनाला सज्ञान ठरवून त्याच्याविरुद्ध खटला चालवावा, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी बाल न्याय मंडळात केला.
कल्याणीनगर भागात १९ मे २०२३ या दिवशी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातापूर्वी मोटारचालक अल्पवयीन आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी मुंढव्यातील पबमध्ये पार्टी केली होती. मद्यप्राशन करुन ते भरधाव वेगात मोटारीने निघाले होते. त्यानंतर अपघात झाला होता.
या प्रकरणात अल्पवयीनाला सज्ञान ठरवून त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्याची मागणी पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्जाद्वारे केली होती. बाल न्याय मंडळाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी गरिमा बागडोडिया यांच्यासमोर सरकार आणि बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवाद झाला. यावेळी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त गणेश इंगळे उपस्थित होते.
सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी अंतिम युक्तिवाद केला. कल्याणीनगर प्रकरणात मोटारचालक अल्पवयीनाकडून ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. अल्पवयीनांचे पुनर्वसन करणे हे बाल न्याय (मुलांची काळजी आणिसंरक्षण) कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मोटारचालक अल्पवयीनाविरुद्ध अन्य कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. अपघाताची घटना दुर्देवी आहे, असा युक्तिवादात केला. या प्रकरणाची पुढील सुनावनी १५ जुलैला होणार आहे.





