लोकप्रिय मालिका ‘दामिनी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! ही अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत; टीझर पाहा….

Damini 2.0 Promo : मराठी दूरचित्रवाहिनीवर दामिनी ही मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली होती. नव्वदच्या दशकात रिलीज झालेल्या या मालिकेने त्याकाळात इतिहास रचत प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली होती. आता लवकरच ही मालिका नव्या रुपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दामिनी २.० या नावाने ही मालिका लवकरच प्रसारित केली जाणार आहे.
मराठी दूरचित्रवाहिनीवरील सह्याद्री या वाहिनीवर १९९७ ते २००७ या काळात दामिनी ही मालिका सुरू होती. पुन्हा एकदा ही मालिका सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मालिकेचा प्रोमो मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अन्यायाविरुद्ध नेहमीच ठामपणे उभी राहणारी निर्भिड पत्रकार दामिनी हिची कहाणी या मालिकेत दाखविण्यात आली होती. त्यावेळी दामिनी ही व्यक्तीरेखा अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी साकारली होती.
View this post on Instagram
आता दामिनी २.० या मालिकेत ही व्यक्तीरेखा अभिनेत्री सुप्रिती शिवलकर ही साकारताना दिसणार आहे. यामुळे नवी दामिनी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. दामिनी नव्या रुपात येण्यासाठी सज्ज झाली असून पुन्हा एकदा तुमच्यासमोर येतेय नव्या रूपात नव्या ताकदीसह असं मालिकेच्या प्रोमोत म्हटलं आहे. या मालिकेच्या चित्रिकरणास सुरुवात झाल्याचे संकेत अभिनेत्री सुप्रिती शिवलकर हिने तिच्या इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमधून दिले आहेत. मात्र, ही मालिका कधीपासून प्रसारित होणार त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : “मी शिवभक्त, मी सर्व विष गिळून टाकतो…” ; आसामच्या सभेत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर टीका





