“मी शिवभक्त, मी सर्व विष गिळून टाकतो…” ; आसामच्या सभेत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर टीका

PM Narendra Modi। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील दरंग याठिकाणी एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नुकत्याच संपलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना, “माँ कामाख्याच्या आशीर्वादाने ऑपरेशन सिंदूरला प्रचंड यश मिळाले” असेही त्यांनी म्हटले. त्यांनी काँग्रेस पक्षावरही तीव्र हल्लाबोल करताना, “मी भगवान शिवाचा भक्त आहे, मी सर्व विष गिळून टाकतो.” अशी टीका त्यांनी केली. त्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी, “केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार आसाम आणि ईशान्येच्या विकासासाठी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे”असेही त्यांनी म्हटले.
भूपेन हजारिका यांचे स्मरण करत पंतप्रधान यांनी, “काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणे हे त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आसामच्या महान मुलांचे आणि पूर्वजांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे”. पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला. त्यांनी आठवण करून दिली की ज्या दिवशी भारत सरकारने भूपेन हजारिका यांना भारतरत्न दिले, त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षांनी मोदी “नर्तक गायकांना” भारतरत्न देत आहेत असे सांगून त्यांचा अपमान केला होता.
पंतप्रधानांचा १९६२ च्या चीन युद्धाचाही उल्लेख PM Narendra Modi।
पंतप्रधान म्हणाले की, “हे विधान आसाम आणि तेथील लोकांच्या योगदानाचाही अपमान आहे.” १९६२ मध्ये चीनशी झालेल्या युद्धाचा संदर्भ देत ते म्हणाले की, “पंडित नेहरूंनी त्यावेळी दिलेल्या विधानानंतर ईशान्येकडील जखम आजपर्यंत बरी झालेली नाही. काँग्रेसची सध्याची पिढीही त्याच जखमेवर मीठ शिंपडण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘मी भगवान शिवाचा भक्त, मी सर्व विष गिळतो’ PM Narendra Modi।
पंतप्रधान म्हणाले, “मला कितीही शिवीगाळ केली तरी मी भगवान शिवाचा भक्त आहे, मी सर्व विष गिळतो पण जेव्हा दुसऱ्याचा अपमान केला जातो तेव्हा मी गप्प राहू शकत नाही.” त्यांनी जनतेला प्रश्न केला की भूपेन दा यांना भारतरत्न देण्याचा निर्णय योग्य होता की नाही. त्यांच्या भाषणात ते म्हणाले, “देशातील जनता माझे स्वामी आहे.”
पंतप्रधानांची आसामला १८,५३० कोटी रुपयांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममधील दरंग आणि गोलाघाट जिल्ह्यात १८,५३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि त्याठिकाणी दोन जाहीर सभांना संबोधित केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी मंगलदोई शहरात दरंग मेडिकल कॉलेज, एक नर्सिंग कॉलेज आणि एक जीएनएम स्कूलची पायाभरणी केली. या आरोग्य प्रकल्पांमध्ये एकूण ५७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.





