Poonam Dhillon : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लों हिच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने हिऱ्याचा हार आणि हजारो रुपये घेऊन पळ काढला. मात्र, अभिनेत्रीच्या मुंबईतील खार येथील घरी चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 37 वर्षीय ‘समीर अन्सारी’ असे आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, चित्रकार समीर अन्सारी (37) याला खार येथील पूनम ढिल्लोंच्या घरातून हिऱ्यांचा हार, 35 हजार रुपये रोख आणि अमेरिकन डॉलर्स चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रंगकामासाठी आलेल्या अन्सारीने उघड्या कपाटातून मौल्यवान वस्तू चोरल्या असल्याचं त्यानं पोलिसांच्या चौकशीत सांगितलं आहे. तसेच, या प्रकरणात सामील असलेल्या इतर व्यक्तींच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. पूनम ढिल्लों यांच्या घरात नेमकं काय घडलं : मुंबई पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला 6 जानेवारीला अटक करण्यात आली होती. अभिनेत्री मुख्यतः जुहू येथे राहते. तर त्यांचा मुलगा अनमोल खार येथील घरात राहतो. पूनम ढिल्लों कधी-कधी इथे राहतात. पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली : आरोपी अन्सारी हा फ्लॅट रंगविण्यासाठी 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान अभिनेत्रीच्या घरी आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यावेळी त्यांनी उघड्या कपाटाचा फायदा घेत मौल्यवान वस्तू चोरल्या. अन्सारीने उघडे कपाट पाहिले आणि संधीचा फायदा घेत चोरी केली. आरोपींनी चोरीच्या काही पैशांची पार्टीही केली होती. पोलिसांनी आरोपी अन्सारीला बोलावून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. अभिनेत्रीची सिनेसृष्टीतील कारकीर्द : पूनम ढिल्लों यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पूनम ढिल्लोंने 1977 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. ती 1980 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली. पूनम ढिल्लोंने तिच्या करिअरची सुरुवात त्रिशूल या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये तिची छोटीशी भूमिका होती. मात्र, नूरी हा त्यांचा पहिला मोठा चित्रपट होता. त्यांचा हा चित्रपट हिट ठरला आणि त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. आज देखील अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.