पुणे | पूजा खेडकर प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याने छळवणूक केल्याची तक्रार आयएएस पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांत दाखल केली आहे. दरम्यान, हा प्रकार पुण्यातील असल्यामुळे पुढील चौकशीसाठी तो तक्रार अर्ज पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याची चौकशी आता पुणे पोलीस करणार असल्याची माहिती वरिष्ठ लीस अधिकार्यांनी दिली आहे. मंगळवारी (दि. १६) रात्री वाशिम पोलीस पुण्यात दाखल झाले होते.
पूजा खेडकर यांची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान या कालावधीत आपली छळवणूक झाल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे. सोमवारी (दि. १५) पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी तब्बल तीन चौकशी केली. पोलीस त्यांच्या चौकशीसाठी आल्याची चर्चा होती.
मात्र, नंतर खेडकर यांनी आपणच घरी महिला पोलिसांना बोलावल्याचे सांगितले. यानंतर पूजा खेडकर यांनी पोलिसांना का बोलावले, याच्या चर्चा झडू लागल्या होत्या. त्यातच आता खेडकर यांनी नोंदविलेल्या जबाबात जिल्हाधिकारी दिवसे यांनी आपली छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान हा प्रकार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्यामुळे ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे.
पुजा खेडकर यांचा खासगी अलिशान गाडीला लालदिवा लावून फिरण्याचा मोह, बैठकीसाठी स्वतंत्र दालन, दिमतीला शिपाई असे अनेक बडेजाव पुढे आले. तेव्हापासून पुजा खेडकर या वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत राहिल्या. त्यांच्या या संपूर्ण प्रकरणाचा पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शासनाला अहवाल पाठविला होता.
पुण्यातील वादानंतर पुजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. त्यातच आता पूजा खेडकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी दिवसे यांच्याविरोधात छळवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. वाशिम पोलिसांत त्यांनी ही तक्रार दाखल केली. या तक्रारीची चौकशी वरिष्ठ अधिकार्यांमार्फत सुरू केली आहे. या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल असे वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.





