पूजा आमची कलेक्टर, पण…स्वप्न अधुरे : कुटुंबीयांच्या भावना ऐकून प्रदीप वळसेंच्या डोळ्यांत अश्रू

जांबूत – माझी पोरगी लयं हुशार व्हती सायेब, तिला कलेक्टर व्हायचं व्हतं, माझ घरदार तीच पुढं घेऊन जाणारी व्हती ओ.. पण तीच आम्हाला सोडून गेली, आता सारं संपलय… असा निशब्द शांततेत हुंदका ऐकला अन प्रदीप वळसेंच्या डोळ्यात अश्रू तराळले. उपस्थितांनाही गहिवरून आले. अंत्यसंस्कारावेळी जांबूत ग्रामस्थांनी सुमारे 1 लाखाहून अधिक रकमेची मदत. पूजा नरवडे हिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केली.
बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलली पूजा ही जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. घरची परिस्थिती एकदम बेताची, आई दुसऱ्यांच्या बांधावर मोजमजुरी करते, तर वडील गावातील दुकानांमध्ये हमालीचे काम करून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. या नरवडे दाम्पत्याला एकूण तीन मुली, त्यातील पूजा दुसरी. जराशे अंधत्व, पण शिक्षणामध्ये मात्र एकदम हुशार. दहावी आणि बारावी इयत्तेत अतिशय चांगल्या गुणाने प्राविण्य मिळवले, आणि पदवीला प्रवेश घेत कलेक्टर व्हायचे स्वप्न तिने उराशी बाळगले.
आई- वडिलांनाही काही प्रमाणात अंधत्वच; मात्र आपल्या प्रामाणिक कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम केले. “”आता मला कलेक्टर होऊन आई वडिलांचे पांग फेडायचे” असे तिने मनाशी ठाम केले; मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच दडले याची पुसटशी कल्पनाही तिला आली नाही.
या साऱ्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील भावनिक झाले. यावेळी जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांचे हस्ते कुटुंबीयांना दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. तर दहा लाख रुपयांची ठेव ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. मात्र पोटचा गोळा गेला अन पैशाचं मोल काय? माझी सोनी मला हवी असा हंबरडा मातेने फोडल्यावर अंगावर मात्र शहारे उभे राहिले.
मदतीचे आवाहन
जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पठारे, ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप, पैलवान प्रशांत जोरी, ऍड. सागर जोरी, संतोष जोरी, दादाभाऊ फलके, शांताराम जोरी आदि युवकांनी या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे.





