पुणे जिल्हा | डाळिंब उत्पादकांना उष्णतेचा फटका; उत्पादन घटले
वडापुरी, (वार्ताहर) – यावर्षीच्या हंगामात दर्जेदार डाळिंबाला 100 रुपये असा दर मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हस्त बहरातील डाळिंबाला प्रतिकिलो 20 रुपये अधिक दर मिळल्याने डाळिंब उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला. पाण्याची टंचाई आणि वाढत्या उष्णतेचा फटका डाळिंबाच्या उत्पादनावर झाला असल्याने उत्पादनात सुमारे 20 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकर्यांचा आर्थिक ताळमेळ काटोकाट लागला आहे.
राज्यात दरवर्षी हस्त बहरातील डाळिंब 30 हजार हेक्टरवर धरला जातो. मात्र, पाणी टंचाईमुळे पाण्याची कमतरता भासू नये यासाठी डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी टँकरने पाणी विकत घेऊन डाळिंबाच्या बागा जगवल्या. काटेकोर व्यवस्थापन करत बागा फुलवल्या. वास्तविक, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हस्त बहरात दर्जेदार डाळिंबाचे दर 20 रुपयांनी अधिक होते. तर दोन नंबरच्या डाळिंबाला 60 रुपये आणि तीन नंबरच्या डाळिंबाला 35 रुपये प्रतिकिलो दर मिळाला.
वाढत्या उष्णतेने नुकसान
यावर्षी तापमान 39 अशांपासून 43 अशांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे शेतकर्यांनी डाळिंब फळाला पेपरच्या सहाय्याने झाकले होते. तसेच अनेक भागांत झाडेही कागदाने झाकली होती. परंतु या वाढत्या तापमानामुळे आच्छादन करूनही काही फायदा झाला नाही. त्यामुळे डाळिंबावर काळे डाग पडले, दाणे काळपट झाले. वाढत्या उष्णतेमुळे डाळिंबाचे नुकसान झाले.
उपादन घटले
गतवर्षी कमी पाऊस, त्यामुळे भूजल पातळीत घट झाली. याचा परिणाम डाळिंब बहरावर झाला. त्यामुळे फळाचा आकार आणि वजन अपेक्षित वाढले नाही. यामुळे डाळिंबाचे उत्पादन 20 टक्क्यांनी घटले. गतवर्षीच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात वाढ झाली असली तरी, उत्पादन कमी असल्याने पिकासाठी घातलेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न याचे गणित जेमतेम जुळले आहे.





