वडापुरी, (वार्ताहर)- इंदापूर तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकर्यांनी विविध पिकांच्या विशेषतः ऊस पिकाची लागण, ज्वारी, मका पेरणीला वेग दिला आहे. त्याचबरोबर परिसरात पिकांना रासायनिक खते देणे, औषधी फवारणी करणे, वखरणे आदी कामांची लगबगदेखील दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या सुरवातीला जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांना चांगलाच दिलासा मिळाला. यादरम्यान पावसाची सतत रिपरिप सुरू होती. पावसामुळे शेतातील विशेषतः बागायती शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण वाढले. तसेच सततच्या पावसामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने पिकांना औषधी फवारणी करणे, खते देणे, पिकांची मशागत करणे आवश्यक होते. आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांकडून ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शेतकर्यांकडून ज्वारी पेरणी, ऊस लागण, मका तसेच जनावरांसाठी चारा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू असून परिसरात सध्या काही शेतकर्यांडून बैलजोडीद्वारे, तर काही शेतकर्यांकडून ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यात येत आहे. विविध शेतीच्या कामांनादेखील शेतकर्यांकडून वेग देण्यात आला आहे. पेरण्यांना वेग शेतीच्या कामांमुळे शहरासह तालुक्यातील शेतशिवार शेतमजुरांनी गजबजू लागल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान, पावसाने अजून चार-पाच दिवस उघडीप दिल्यास पेरण्या मोठ्या प्रमाणावर उरकवण्यात येतील, असे बोलले जात आहे.