पुणे जिल्हा | महायुतीत हर्षवर्धन पाटलांची वेगळी चूल ?

वडापुरी,{विजय शिंदे} – इंदापूर विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. भाजपचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या बावडा गावात कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केली आहे तर इंदापूर तालुका विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसापर्यंत इंदापूर तालुक्यात 100 विकास आघाडीच्या शाखा उघडून विधानसभेची तयारी करण्यात येणार आहे.
त्यामुळे पाटलांनी महायुतीत वेगळी चूल मांडल्याची जोरदार चर्चा आहे. इंदापूरच्या मैदानात पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार आहेत. तर हर्षवर्धन पाटलांनीही इंदापूरमधून लढण्याचे संकेत दिले. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे देखील इच्छूक आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला इंदापूरमधून अपेक्षित मते मिळाली नाहीत.
भाजप आणि मोदींवरील नाराजीचा फटका बसल्याची चर्चा होती. त्यातच तालुकास्तरीय आघाडी काढून हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांना बळ दिले. उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानेच हर्षवर्धन पाटलांनी आतापासूनच अपक्ष म्हणून मोर्चेबांधणी सुरू केल्याचे सांगितलं जात आहे.
बॅनबाजीला ऊत
हर्षवर्धन पाटील यांच्या जुन्या कार्यकर्त्यांचा तसेच अल्पसंख्यांक व दलित समाजातील कार्यकर्त्यांच्या आग्रह आहे की हर्षवर्धन पाटील यांनी विकास आघाडी या संघटनेच्या माध्यमातून अपक्ष अर्ज भरावा. यामुळेच इंदापूर तालुक्यात विकास आघाडी स्थापन झाली असल्याची चर्चा आहे. काही मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीची बॅनरबाजी केली आहे.
तर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील
इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांचा एक ठरलेला मतदार वर्ग आहे. त्यामुळे दोन्ही नेते निवडणुकीतून माघार घेणार नाहीत.
अशावेळी बंडखोरी झाल्यास महायुतीतील एक जागा अडचणीत येऊन हर्षवर्धन पाटील यांच्याकडील मतांचा आकडा पाहिल्यास महाविकास आघाडीची एक जागा निघू शकते त्यामुळेच ऐनवेळी विकास आघाडीचे हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असेही बोलले जात आहे.
म्हणून कार्यकर्ते पेटून उठलेत
1995, 1999 आणि 2004 या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि जिंकल्या. 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी विमान चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली होती. 2009 मध्ये पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रेवश केला होता.मात्र, आघाडीत अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली.
आता पुन्हा तेच अजित पवार हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरत असल्याने कार्यकर्ते पेटून उठलेत. इच्छुकांची संख्या वाढल्याने इंदापूरमध्ये यावेळी काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.





