वडापुरी, {विजय शिंदे} – लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आलेल्या अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत नेते सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील स्वागताच्या बॅनरवरून भाजप नेत्यांचे फोटो हटवल्यानंतर तसेच कार्यकर्त्यांनी लावलेल्या तालुकाभर विकास आघाडीच्या बॅनर वरून चर्चेत आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून अजून एक पोस्ट व्हायरल होत आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सध्या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांना आता सोशल मीडियात व्हायरल होणार्या एका पोस्ट ने खतपाणी दिले आहे. गुरुवारी (दि. 18) सकाळी आठ वाजल्यापासून हर्षवर्धन पाटील हे बावडा येथील रत्नाई निवासस्थानी नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी उपलब्ध असल्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या पोस्ट वरती फक्त हर्षवर्धन पाटील यांचा फोटो आहे. मात्र या पोस्टमधून कमळ चिन्ह आणि भाजपचे नेते गायब आहेत. त्याहून पलीकडे ही पोस्ट हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनीच शेअर केली आहे. त्यावर हर्षवर्धन पाटील सध्या भाजपा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील विधानसभेची अपक्षाची तयारी करताहेत असेही बोलले जात आहे. …अन् सासूचं वाटणीला आली 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिघाडी झाली अन् राष्ट्रवादीचे तथा अजित पवार यांचे कट्टेर उमेदवार दत्तात्रय भरणेंकडून पाटलांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपचे कमळ हाती धरले. 2019मध्ये पुन्हा कमळाच्या चिन्हावरही त्यांचा पराभव पत्कारावा लागला होत. मात्र, हा पराभव पचवत ते भाजपमध्ये चांगलेच स्थिरावलेले असताना अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने इंदापूर विधानसभेच्या जागेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. आमदार दत्तात्रय भरणे की हर्षवर्धन पाटील महायुतीचे उमेदवार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला असून आमदार भरणे यांच्यासाठी काँग्रेस पक्ष सोडला; परंतु भाजपमध्ये शेवटच्या क्षणी भरणेच वाट्याला आले, अशी अवस्था हर्षवर्धन पाटील यांची झाली आहे. ग्रामीण भागाती कार्यकर्ता नाराज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेवर संधी मिळेल असी कार्यकर्त्यांना आशा होती, परंतु पुणे शहरातील योगेश टिळेकर व अमित गोरखे यांना संधी मिळाली त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची निराशा झाली. भरणेंना ग्रीन सिग्नल महायुतीकडून इंदापूर विधानसभेची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना तशा पद्धतीने तयारी करण्याच्या सूचना मिळाल्याची चर्चा इंदापूर शहर व ग्रामीण भागात आहे. पुन्हा हात, तुतारी की अपक्ष.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वर्ष काँग्रेस सोबत काम केले आहे, त्यामुळे त्यांचे काँग्रेस मध्ये अनेक मित्र आहेत तसेच त्यांचे शरद पवार यांच्याशी संबंध चांगले आहेत त्यामुळे पाटील पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार की शरद पवार यांची तुतारी हाती घेणार की कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अपक्ष लढणार अशी चर्चा इंदापूर तालुक्यात आहे.