Delhi Pollution : दिवाळीनंतर दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती गंभीर; सरकारने उचलली कडक पावले, ‘या’ गोष्टींवर घालणार बंदी !

Delhi Pollution – दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) अद्यापही 400च्या पुढे गेलेला आहे. दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची परिस्थिती गंभीर बनली आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजता दिल्लीच्या बवाना येथे 442, जहांगीरपुरीमध्ये 441, आनंद विहारमध्ये 412, आयटीओमध्ये 412 आणि आयजीआय विमानतळाजवळ 401 एक्यूआय नोंदवण्यात आले.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत इतर राज्यांतून येणाऱ्या बीएस-3 आणि बीएस-3 डिझेल बसेसवर बंदी घालण्यात येऊ शकते. फक्त इलेक्ट्रिक, सीएनजी आणि बीएस-6 डिझेल बसेसना प्रवेश दिला जाईल. छठ उत्सवानंतर दिल्ली सरकार याची अंमलबजावणी करू शकते.
दिल्लीत 5 नोव्हेंबरपासून प्रदूषणकारी ट्रक आणि व्यावसायिक वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) मते, या आठवड्यात दिल्लीतील प्रदूषणापासून सुटका मिळण्याची आशा नाही. पुढील चार दिवस धुके कायम राहणार आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आज प्रदूषणाबाबत आढावा बैठक बोलावली आहे.
दिल्लीत कृत्रिम पावसाची शक्यता
दिल्लीचे केजरीवाल सरकार 21-22 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच दिल्लीत कृत्रिम पावसाची योजना तयार करत होते. यासाठी पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी 8 नोव्हेंबर रोजी आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांसोबत बैठक घेतली होती. दरम्यान, 9-10 नोव्हेंबर रोजी पाऊस झाला. त्यामुळे प्रदूषणाची पातळी 50 टक्क्यांनी कमी झाली.
ग्रॅप-4 दिल्लीत लागू
ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन (जीआरएपी) चा चौथा टप्पा 5 नोव्हेंबरपासून दिल्लीत लागू होत आहे. या अंतर्गत व्यावसायिक वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. भाजीपाला, फळे, औषधे, सीएनजी आणि इलेक्ट्रिक ट्रक यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या ट्रक वगळता इतर ट्रकच्या वाहतुकीस मनाई आहे.
ग्रॅप-4 अशा ठिकाणी लागू केला जातो जेव्हा एक्यूआय शेवटच्या टप्प्यावर म्हणजे 400-500 दरम्यान पोहचतो. दिल्लीमध्ये ग्रॅप-4 च्या अंमलबजावणीसोबत, ग्रॅप-1, 2 आणि 3 चे नियम देखील लागू आहेत. या अंतर्गत अत्यावश्यक बांधकाम, बीएस-3 श्रेणीचे पेट्रोल आणि बीएस-4 श्रेणीतील डिझेल, चारचाकी वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने उचलली ही पावले…
– दिल्लीबाहेर नोंदणीकृत ओला-उबेरसह इतर ऍप-आधारित टॅक्सींच्या प्रवेशावर बंदी
– दिल्लीत रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल, ओव्हर ब्रिज, वीज पारेषण, पाइपलाइन यासह सर्व प्रकारच्या विकासकामांवरही बंदी
– अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे डिझेल ट्रक आणि एलएनजी, सीएनजी, इलेक्ट्रिक ट्रक वगळता सर्व वाहनांवर बंदी
– दिल्लीत फटाक्यांवर बंदी. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिल्ली पोलिसांना दिवाळीनंतर, विश्वकरंडक सामन्यादरम्यान आणि छठच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना
– दिल्लीतील प्रदूषणामुळे 9 ते 18 नोव्हेंबरपर्यंत शाळांना हिवाळी सुटी जाहीर





