Farooq Abdullah : फारुख अब्दुल्ला यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; भाजप नेते अल्ताफ ठाकूर यांची मागणी
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी पाकिस्तानच्या भूमिकेबाबत केलेल्या विधानावरून राजकारण तापले आहे.

Farooq Abdullah : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी पाकिस्तानच्या भूमिकेबाबत केलेल्या विधानावरून राजकारण तापले आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असल्यामुळेच इथले लोक वाचले आहेत, अन्यथा भारताचे इरादे चांगले नाहीत, असे वक्तव्य अब्दुल्ला यांनी बारामुल्ला येथील एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले होते. या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.
जम्मू-काश्मीर भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्या या वक्तव्याला देशद्रोही आणि भारतविरोधी म्हटले असून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अल्ताफ ठाकूर यांनी अब्दुल्ला यांच्यावर टीका करताना म्हटले की, भारताच्या संविधानानुसार शपथ घेतलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर बोलताना जपून विधान करायला हवे.
अब्दुल्ला पाकिस्तानच्या बाजूने बोलत असून देशाच्या नागरिकांप्रति भारताच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. जर त्यांना पाकिस्तानवर इतकाच विश्वास असेल, तर त्यांनी तिकडे निघून जावे, असा पलटवारही ठाकूर यांनी केला. भाजप प्रवक्त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, गेल्या कित्येक दशकांत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरला दहशतवाद, रक्तपात, भीती आणि अनिश्चिततेशिवाय काहीही दिलेले नाही.
पाकिस्तानातील पोकळ आश्वासनांमुळे तिथले लोकही त्रस्त असून त्यांना भारतात सामील व्हायचे आहे. काश्मीरमधील जनतेचे सध्याचे मुख्य प्राधान्य हे शांतता, विकास, रोजगार आणि मुलांचे सुरक्षित भविष्य हेच असल्याचे त्यांनी (Farooq Abdullah) सांगितले.






