Omar Abdullah : जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार; मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचे आमदारांना मोठे आवाहन
जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. मात्र, मंत्रिपदांसाठी लॉबिंग न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी आमदारांना केले आहे.

Omar Abdullah : जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. मात्र, मंत्रिपदांसाठी लॉबिंग न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी आमदारांना केले आहे. विस्तारासमवेत मंत्रिमंडळात काही फेरबदलही केले जाणार आहेत. उमर यांनी शनिवारी सकाळी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. त्या भेटीचे कारण उमर यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदलाच्या योजनेची माहिती मी सिन्हा यांना दिली. तसेच, त्यासाठी वेळ निश्चित करण्याची विनंती केली. नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्यांची यादी निश्चित केली आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळवण्याच्या उद्देशातून लॉबिंग न करण्याचे आवाहन मी सहकाऱ्यांना करतो, असे ते (Omar Abdullah) म्हणाले.
विस्तारात एनसीच्याच आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये २०२४ यावर्षी विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये एनसी आणि कॉंग्रेसच्या आघाडीने बाजी मारली. मात्र, सरकारमध्ये सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला. त्या पक्षाने सरकारचा भाग बनावे अशी उमर आणि एनसीची प्रारंभीपासून इच्छा आहे.
मात्र, केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल होईपर्यंत सत्तेत सहभागी न होण्याची ठाम भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. त्या भूमिकेचा पुनरूच्चार जम्मू-काश्मीर कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष रमन भल्ला यांनी शनिवारी केला. आम्हाला जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा हवाय. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये दुहेरी सत्ताकेंद्रांची व्यवस्था आहे. त्याऐवजी एकच सत्ताकेंद्र हवे. जनतेच्या हक्कांचे रक्षण व्हायला हवे, असे त्यांनी (Omar Abdullah) म्हटले.






