राजकारण : राहुल यांना सापडला सूर!

देशात सक्षम विरोधी पक्ष असलाच पाहिजे. या संदर्भात राहुल यांनी उत्तम भाषण करून काही प्रमाणात आशा निर्माण केली असली, तरी त्यांना आपल्या कामात सातत्य मात्र ठेवावे लागेल.
“भारतात आज पंतप्रधान नसून, एक शहेनशहाच आहे, ज्याला वाटते की ते निर्णय घेत असताना लोकांनी शांत बसावे… आतापर्यंत भारताने चीन आणि पाकिस्तानला एकत्र येऊ न देण्याचीच दक्षता परराष्ट्रनीतीतून घेतली होती; परंतु आता आपल्या चुकीच्या धोरणांमुळे चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत. श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान, चीन असा सगळ्या बाजूंनी आपण घेरलो गेलो आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत एकाकी पडला आहे. भारत हे संघराज्य आहे. दिल्लीने राज्यांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे. दिल्लीत बसून आपले निर्णय राज्यांवर थोपवता कामा नये.
भाजप आणि त्यांची विचारसरणी आपल्या देशाला धोक्याच्या दिशेने घेऊन जात आहे. आज देश दोन देशांमध्ये विभागला जातोय. एक निवडक करोडपतींचा आणि दुसरा गरिबांचा…’ कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत भाषण करताना मोदी सरकारवर अशी घणाघाती टीका केल्यामुळे, तोच एक चर्चेचा विषय बनला. शिवसेनेने तर “राहुल यांनी भाजपच्या डोक्याला शॉट दिला आहे’, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे. राहुल यांच्या भाषणावर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तुच्छतेच्या भाषेत टीका केली आहे. परंतु अटलजींच्या सरकारविरोधी भाषणाचे पंडित नेहरू कौतुक करत. पिलू मोदी इंदिरा गांधी सरकारचे वाभाडे काढत, पण भाषण संपताच इंदिराजी लगेच पिलूजींनाच चिठ्ठी पाठवून त्यांच्या भाषणाचे कौतुक करत, याचा उल्लेख शिवसेनेच्या मुखपत्राने केला आहे.
केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे नेते राहुलजींना कमी समजत असले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजपचे मुख्य प्रवक्ते संबित पात्रा यांच्यापर्यंत सर्वजण त्यांची टिंगल करत असले, तरीदेखील गेल्या आठवड्यात राहुल यांनी लोकसभेत केलेले भाषण केवळ पाच तासांत सोळा लाख वेळा पाहिले गेले. इंटरनेटवर त्यांच्या भाषणाबद्दल विभिन्न मते असली, तरी त्या भाषणाची दखल घेतली गेली, हे महत्त्वाचे. काही महिन्यांपूर्वी स्टॅंडअप कॉमेडियन वीर दास याने वॉशिंग्टन डीसीमध्ये केलेल्या भाषणात “दोन भारतां’चा उल्लेख केला होता. तेव्हा त्याने देशाचा अवमान केल्याची टीका झाली होती. परदेशात जाऊन पंतप्रधान मोदी यांनी मात्र “भारतात कॉंग्रेस पक्षाने सत्तर वर्षांत भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काहीही केले नाही आणि भारत मागास राहिला’, अशी अवास्तव टीका अनेकदा केली. मात्र, तेव्हा ती भाजपला अवमानकारक वाटली नाही! ते काहीही असले, तरी एरवी फारसे न्यूजमेकर न ठरणारे राहुल यावेळी मात्र प्रकाशझोतात आले असून, सर्वच पक्षांना त्यांची दखल घ्यावी लागली आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी कलावती यांसपासून ते मोदी यांना दिलेल्या आलिंगनापर्यंत विविध विषयांवर राहुल यांच्याबाबत लाखो मिम्स बनली आहेत. परंतु आता या देशात दोन भारत आहेत. “एक अब्जाधीशांचा आणि एक गरिबांचा’, हे त्यांचे भाष्य चर्चाविषय बनून राहिले आहे. याचे कारण नुकतेच एका आंतरराष्ट्रीय अहवालात भारतात विषमता कशी टोकाच्या पद्धतीने वाढत आहे, हे दाखवून देण्यात आले आहे. “ऑक्सफॅम’ या जगद्विख्यात संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात भारतातील वाढत्या आर्थिक विषमतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
2021 मध्ये 84 टक्के सामान्यजनांच्या उत्पन्नात घट झाली असून, देशातील अब्जाधीशांची संख्या मात्र 102 वरून 142 वर जाऊन पोहोचली आहे. या अब्जाधीशांची एकूण संपत्ती 720 अब्ज डॉलर इतकी असून, भारतातील 40 टक्के गरिबांच्या एकूण संपत्तीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. भारताच्या तुलनेत सर्वाधिक अब्जाधीश सध्या केवळ अमेरिका आणि चीनमध्ये आहेत. फ्रान्स, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या प्रगत देशांशी तुलना करता, भारतात अब्जाधीशांची संख्या जास्त आहे. दुसरीकडे देशातील 50 टक्के गरीब नागरिकांचा राष्ट्रीय संपत्तीतील वाटा केवळ सहा टक्के आहे. यावरून भारतात आर्थिक असमानता किती वेगाने वाढते आहे, हेच दिसून येते.
विशेष म्हणजे, राहुल यांनी अंबानी आणि अदानी या दोघांची नावे घेऊन टीका करण्याचे धाडस दाखवले. कॉंग्रेसचा राष्ट्रवाद आणि भाजपचा राष्ट्रवाद यांच्यातील फरकही त्यांनी दाखवून दिला आणि आम्ही कोणत्याही एका धर्माविरुद्ध नसल्याचे स्पष्ट केले. राहुल यांनी असंघटित क्षेत्र, बेरोजगारी, विद्यार्थ्यांची आंदोलने, भारतातील विविधता, सरकारी यंत्रणांच्या विश्वासार्हतेला गेलेला तडा, पेगॅसस या सर्व विषयांना स्पर्श केला.
बऱ्याच दिवसांनी राहुल यांना सूर सापडला असून, देशातील एक आघाडीचे सामाजिक विचारवंत आशुतोष वार्ष्णेय यांच्यापासून ते चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यापर्यंत अनेकांनी याबद्दल त्यांचे जाहीर कौतुक केले आहे. राहुल यांच्या पंचवीस मिनिटांच्या भाषणाने काहीएक प्रभाव निर्माण केल्यामुळेच मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ट्विट करून, कॉंग्रेसच्या काळातील परराष्ट्र धोरणाचे कोणते परिणाम झाले, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग यांच्यावरील टिप्पणीबद्दल राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय कायदामंत्री किरण रिजिजू यांनी केली. तर कॉंग्रेसमध्येच पक्षश्रेष्ठींची “शाही’ असल्याचा उल्लेख आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा यांनी केली. तर भारताच्या संघराज्यात्मक चौकटीबद्दल राहुल यांनी केलेली मांडणी धोकादायक असल्याचे ताशेरे भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी झोडले.
यापूर्वी “सूटबूट की सरकार’, “हम दो हमारे दो’ अशा तिखट टिप्पण्यांमुळे राहुल यांनी सत्ताधारी पक्षाला अस्वस्थ करून सोडले होते. गेल्या हिवाळी अधिवेशनात, देशातली कोविडबळींची अचूक आकडेवारी सरकारने जाहीर करावी, तसेच कोविडबळींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. कोविड महामारी वाढण्याची शक्यता आहे, हे राहुल गांधींनी अगोदरच सांगितले होते.
देशातील गरिबांना कोविडकाळात थेट रोख मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. राहुल यांनी सांगितल्याप्रमाणेच कोविड महामारी वाढली, तसेच सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्यामुळे कोविडकाळात देशातली गरिबांची संख्या वाढली, हे लक्षात घेतले पाहिजे. गलवान खोऱ्यात घुसखोरी झालीच नाही, हा सरकारचा दावाही पोकळ असल्याचे राहुल यांनी दाखवून दिले होते.
हेमंत देसाई





