Satara | विचारांचे राजकारण टिकते, तात्पुरते राजकारण टिकत नाही

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – आपण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचे व विकासाचे राजकारण करतो. काहीजण सत्तेसाठी पळापळ करतात.सत्तेसाठी झालेली पळापळ जनतेने ओळखली आहे आणि त्याचे प्रतिबिंब लोकसभेच्या निकालात दिसले आहे.
राज्यात महाविकास आघाडीकडे मतदारांचा कल आहे. चव्हाण साहेबांच्या मतदारसंघात विचारांचे राजकारण टिकते. तात्पुरते राजकारण टिकत नाही, असे प्रतिपादन आ.बाळासाहेब पाटील यांनी केले.
वांझोळी (ता.खटाव)येथील विविध विकासकामाच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, माजी सदस्य जितेंद्र पवार, सी.एम.पाटील, सुहास पिसाळ,संभाजी थोरात,कृष्णत पिसाळ,विलास शिंदे,सुनिता मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले,लोकसभा निवडणुकीत कमी यश आल्याने अनेक योजना जाहीर करण्याचे काम सुरू आहे. या योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत. हे जनतेला समजले आहे. सातारा लोकसभेत सारख्या दिसणाऱ्या चिन्हामुळे पराभव पत्करावा लागला. भाजपाला सरकार स्थापन करण्यास इतरांची मदत घ्यावी लागली. शिंदे फडणवीस सरकारने या मतदारसंघातील अनेक कामांना स्थगिती दिली होती. त्यावर आवाज उठवून विकास कामे सुरू केली आहेत. कराड उत्तर मतदार संघातील सर्वांना समान न्याय दिला आहे.
जनता हीच आमची ताकद आहे त्याच्या जोरावर विकास कामे करत आहे.विकास कामे करत असताना पाठपुरावा महत्त्वाचा असतो.ग्रामस्थांनी माझ्याकडे केलेल्या मागणीनुसार व पाठपुराव्यानुसार निधीची उपलब्धता करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
परंतु,लोकप्रतिनिधी म्हणून मी मंजूर केलेली कामे काहीजण आम्ही केली असे सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत असे आ.पाटील म्हणाले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अरविंद मगर यांनी केले. भाग्यश्री भाग्यवंत, जितेंद्र पवार, सी.एम.पाटील, शहाजी मगर,बाळासाहेब मगर यांनी मनोगत व्यक्त केले.आभार किसन मगर यांनी मानले.





